जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.शेतकऱ्यांच्या शेतातून अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याने संबंधित अभियंते व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दखल करुन त्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्याची मागणी.
मागील दोन महिन्यांपासून नगर तालुक्यातील मौजे.उक्कडगाव ते टाकळी काझी गाव या दरम्यान प्र.जी.मा. १७७ क्रमांकाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी शासनाने ५.५ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या कामाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD )नगर तालुका यांचे कडे आहे. रस्त्याचे काम सुरू असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम वापरण्याची गरज आहे. परंतु संबंधित रस्त्याच्या कंत्राटदाराने स्वताचे पैसे वाचविण्यासाठी PWD अभियंत्यांच्या सांगण्यावरून रस्त्याच्या शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून अवैध उत्खनन केलें आहे. तसेच शेतकऱ्यांकडून किंवा आपल्या विभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, संबंधित शेतकऱ्यांना धमकावून त्या ठिकाणचा मुरूम हा अवैधरित्या उचललेला असल्याने,
या अवैध मुरूम उत्खननासाठी वापरल्या गेलेल्या 1 पोकलेन मशीन आणि डंपर (हायवा) क्रमांक १) MH 16 DK 3800 2) MH16 DJ 3800 तसेच संबंधित कंत्रादार आणि विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग नगर तालुक्याचे उपाभियंता शशिकांत सुतार व संबंधित रस्त्याची देखरेख करणारे शाखा अभियंता रामराव मेहत्रे यांच्यावर तात्काळ अवैध उत्खनन केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अशोक बनसोडे, विक्रम बेरड, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना घेऊन आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.