म.वि.आ.चा पराजय EVM मुळे नव्हे तर SC, ST, OBC व मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर योग्य भुमिका स्पष्ट न केल्याने झाला.
पंढरपूर (प्रतिनिधी)
नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र मतमोजणी नंतर आलेले निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरले. महाविकास आघाडीला राज्यात वातावरण अनुकूल असुनही निकाल वेगळाच आल्याने महाविकास आघाडीकडून EVM बाबत शंका घेतली जात असतानाच पंढरपुरातील आदिवासी कोळी जमातीचे नेते गणेश अंकुशराव यांनी मात्र महाविकास आघाडीचा हा पराजय EVM मुळे नव्हे तर SC, ST, OBC व मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर योग्य भुमिका स्पष्ट न केल्याने झाला असल्याचे प्रतिपादन केले आहे.
आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्यातील विविध समाजात असंतोष पसरला असताना महाविकास आघाडीतील विविध पक्षातील नेते मंडळींनी मात्र यावर मुग गिळून गप्प बसण्याची भुमिका घेतली. विशेषतः SC, ST, OBC व मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर निवडणुक काळात महाविकास आघाडीनं आपली भुमिका स्पष्ट करत या सर्व समाज घटकांचे आरक्षणासह विविध प्रश्न आम्ही सोडवू असा विश्वास द्यायला हवा होता
परंतु यावर महाविकास आघाडीकडून कसलंच आश्वासन दिले गेले नाही त्यामुळे या सर्व समाजातील मतदारांनी महाविकास आघाडीकडं पाठ फिरवली. त्यामुळंच महाविकास आघाडीवर राज्यात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवली गेली. असंही गणेश अंकुशराव यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, साधु संतांची भुमी आहे, इथं जातीयवादाला खतपाणी घालणारांना मुठमाती दिली जाते, आणि तेच या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केवळ ईव्हीएम वय संशय घेण्यापेक्षा याकडंही लक्ष देऊन आपल्या पराजयातुन धडा घ्यावा असंही गणेश अंकुशराव यांनी म्हटलंय. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीतील पराजय ईव्हीएम मुळं नाही तर इतर कारणांमुळंही झाल्याच्या चर्चेला उधाण आल्याचं दिसून येत आहे.