राज्याच्या शालेय शिक्षणात अहमदनगर जिल्हा अव्वल ठरावा!
आमदार सत्यजीत तांबे यांची जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालय येथे नुकतीच एक नियोजित बैठक पार पडली. राज्याच्या शालेय शिक्षणात जर अहमदनगर जिल्ह्याला अव्वल ठरवायचे असेल तर शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांना एकत्रितपणे काम करावे लागेल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागतील असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर बैठकीत केले आहे.
यावेळी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुद्देसुदपणे विस्तृत चर्चा झाली असून शिक्षकांचे मासिक वेतन ‘झेडपीएफएमएस’ प्रणालीद्वारे करण्याची मागणी आमदार तांबे यांनी केली आहे. शिक्षकांच्या शालार्थ वेतनासाठी शिक्षणाधिकारी खाते हे स्टेट बँकेत उघडावे व जिल्हा परिषदांसह सर्व पंचायत समिती स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी अशी विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पीएफचा प्रस्ताव सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात यावी, त्यादृष्टीने आपल्या यंत्रणेमध्ये बदल करावे. सोबतच मेडिकल बिले, पेन्शन प्रकरणे, स्थायित्व प्रमाणपत्र व पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे पदोन्नती असे प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबतच पदवीधर वेतनश्रेणी नाकारणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून त्यांना समुपदेशनाने पदस्थापना द्याव्यात अश्या सूचना तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षक पुरवणी देयके व शिक्षक वैद्यकीय देयके निधीअभावी प्रलंबित आहेत. सदर निधीसाठी असलेली प्री- ऑडीटची अट शिथिल करून अतिरिक्त निधी देण्यात आलेल्या तालुक्यांचे समायोजन करावे. तसेच अतिरक्त निधीसाठी राज्य स्तरावर मागणी करावी आणि दाखल व मंजूर तारखेनुसार सेवाज्येष्ठतेने ते अदा करण्यासाठी पंचायत समित्यांना आदेशित करावे अशी विनंतीदेखील आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर बैठकीदरम्यान केली आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे सादर करतेवेळी ऑनलाईन प्रशिक्षणाची अट नसल्यामुळे ऑफलाईन प्रशिक्षण घेतलेले सर्व प्रस्ताव मंजूर करून त्यातील फरक नियमित वेतनाबरोबरच अदा करण्यासंदर्भात व पात्र शिक्षकांच्या निवडश्रेणी प्रस्तावांच्या मंजुरीला गती देण्यासंदर्भातदेखील सदर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच सन २००४ साली सेवेत आलेल्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या पाच समान हप्त्यांपैकी फक्त दोन, तीन किंवा चार हप्ते जमा झालेले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन उर्वरित सर्व हप्ते संबंधितांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा व्हावेत. अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. सोबतच मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता फरक नियमित वेतनातून शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यासाठी पोर्टलवर टॅब सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण राज्य स्तरावर मागणी करावी व प्रलंबित महागाई भत्ता फरक लवकरात लवकर ऑफलाईन अदा करावा. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यात यावा अश्या सूचना तांबे यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रशासकीय कामांना गती देण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी यांना ३१ मे पूर्वी पदोन्नती देण्याच्या सूचना कराव्यात व प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणत्याही शिक्षकाची गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे सन २०२२- २३ च्या संचमान्यतेनुसार समायोजन करावे. तसेच यादरम्यान शासनाच्या बदली प्रक्रियेनुसार बदली झालेल्या शिक्षकांना शासन आदेशानुसार दि.१६ मे रोजी कार्यमुक्त करण्यात यावे व सन २०१९-२० साली झालेल्या बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांची फेरसुनावणी घेऊन त्यांना पदस्थापना द्याव्यात. पदवीधर पदावरील शिक्षकांचे वेतन हे बरोबर सेवेत आलेल्या उपाध्यापकांपेक्षा कमी आहे. पदवीधर शिक्षकांच्या वेतननिश्चीतीतील त्रुटी व तफावती दूर करून त्यांचे वेतन समान असावे तसेच मार्च अखेर प्रत्येक वर्षी शिक्षकांचे सेवापुस्तके अद्ययावत केल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून घ्यावे अशी मागणीदेखील आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर बैठकीत केली आहे.
शासन आदेशानुसार वय वर्षे ५० ओलांडलेल्या प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागात जमा करावे लागते. जिल्ह्यात अश्या शिक्षकांची संख्या तीन हजारांहून अधिक असल्या कारणामुळे त्यांच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात अनेक अडचणी येतात. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र ग्राह्य धरण्यासाठी आदेश देण्यात यावेत. तसेच शासनाच्या आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या व वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा दिल्यानंतर स्वजिल्ह्यात हजर झालेल्या सर्व शिक्षकांना स्वतालुक्यात पदस्थापना देण्यात यावी. सोबतच जिल्ह्यातील अनेक शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात सेवा करीत असल्याने जास्तीत जास्त जागा निर्माण होतील असा प्रयत्न करून रिक्त पदे अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्याची विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंशदायी पेन्शन योजनेतील अनेक खातेधारकांना स्वतःच्या कपाती, शासनहिम्सा, जमा व्याज यांची हिशोब चिट्ठी (वार्षिक स्लीप) यांमध्ये मोठ्या तफावती व चुका आढळून आल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या व अंशदायी पेन्शन योजनेचे खातेधारक असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा दोन्ही जिल्हा परिषद मिळून एकत्रित हिशोब केला गेलेला नसून एनपीएस धारक शिक्षकांचे डीसीपीएस खाते कपातीचा हिशोब पूर्ण करून संबंधित प्रभारींकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे. तसेच नाशिक कार्यालयातील विभागीय आयुक्त व अप्पर आयुक्त यांच्या विभागीय चौकशीतून न्याय मिळालेल्या शिक्षकांना नियमित सेवेत हजर करून घेण्याचे प्रलंबित निर्णय तातडीने मंजूर करावेत व निलंबित शिक्षकांचा तीन महिने कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सदर बैठकीत केली आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी म्हणून खाजगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद स्तरावर गुणवंत प्राथमिक शिक्षकांचा कृतीगट तयार करून जिल्हा परिषदेने वर्षातून एकदा इयत्तावार स्पर्धा परीक्षांचे आयोजन करावे अशी महत्वाची संकल्पना आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली आहे. तसेच गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षक यांचे बक्षीसपात्र क्रमांक लवकरात लवकर घोषित करून इतरांना सहभाग प्रमाणपत्राचेदेखील वितरण करावे अशी सूचनादेखील केली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालय येथे पार पडलेल्या सदर बैठकीत प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, अतिरिक्त सामान्य प्रशासन व वेतन अधीक्षक संध्या भोर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोहन कडलग यांच्यासह शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले, प्राथमिक शिक्षक संघटनेचे बापूतांबे व शिक्षक नेते राजेंद्र लांडेकर,हिरालाल पगडाल, अप्पासाहेब शिंदे, वैभव सांगळे, जिल्हाअध्यक्ष प्रवीण ठुबे, विकास डावखरे, अविनाश निंभोरे, अविनाश साठे, बाबुराव कदम, कारभारी बाबर, रामनाथ मोठे , नानासाहेब बडाख, गणेश वाघ, शरद कोतकर, संजय दळवी, सुनील दुधाडे आदिंसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते