100 नर्सर्या, 650 एकर गुलाबशेती, 3000 तरुणांना रोजगार, वर्षाला 20 कोटींचं उत्पन्न पहा बातमी सविस्तर.
शिर्डी जवळच्या रहाता तालुक्यातील अस्तगांव या गावाची कहाणी काही खूपच रंजक आहे. या गावाचं नाव जरी ‘अस्त’ असलं तरी कर्तृत्वात विलक्षण ‘उदय’ आहे. या गावात जवळपास 600 एकरवर गुलाबाची लागवड होत असून वार्षिक तब्बल 21 कोटींची उलाढाल होत आहे. नगर जिल्ह्यातलं असं हे गाव प्रगतीवर असल्याचं कोणाला कल्पनाही नव्हती. परंतु जवळचं असलेलं शिर्डीसारख्या आंतराष्ट्रीय देवस्थानाचा या गावाच्या भरभराटीस मोलाचा वाटा आहे.साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या भाविकांमार्फत मूर्तीला दररोज एक गुलाबाचा हार अर्पण करण्यात येतो. हे सर्व गुलाब हे अस्तगावातून येत असतात. फुलांना शिर्डीसारखी हक्काची बाजारपेठ मिळत असल्याने रोज मागणीही वाढत आहे.
अस्तगावच्या या गुलाब शेतीसाठी प्रसिद्ध फुल शेती तज्ञ दिवंगत विलास डुंगरवाल यांनी 30-35 वर्षांपुर्वी या व्यावसायाची मुहर्तमेढ रोवली. त्यांनीच प्रथम या लागवडीची सुरुवात केली. एका प्रदर्शनातून त्यांनी गुलाबांची 25 रोपं आणून आपल्या शेतात लावली होती. फुले यायला सुरुवात झाल्याने त्यांना शिर्डीसारखी बाजारपेठही मिळाली. त्यामुळे त्यांनी पारंपारिक शेती सोडून संपूर्ण शेतजमिनीवर गुलाब शेतीची लागवड केली. यामुळे गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनीही गुलाब शेती सुरु केली. सध्या गावात गुलाब, झेंडू, मोगरा, अष्टर ई. फुलांची तब्बल 650 एकरावर फुलशेतीची लागवड होत असून शिर्डीसारखी मोठी बाजारपेठही मिळाल्याने मागणीही वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे.
शिर्डीत रोज 6 लाख फुले येतात. शेतकऱ्यांकडून शेकडा 80 ते 90 रुपयांना येथे गुलाबांची खरेदी होते. यातील 25 टक्के फुले शिर्डीत विकली जातात. बाकीची देशभरातील फुल मार्केटमध्ये पाठवली जातात. तेथे ती शेकडा 200 रुपयांपर्यंत भाव मिळतो. या फुलांच्या खरेदी विक्रीतून सुमारे दिवसाला 6 लाखांची उलाढाल होते. फुलांचा सिझन बारामाही असल्याने या फुलशेतीतून सुमारे वर्षाला 21 लाखांची उलाढाल होत आहे.या अस्तगांव पंचक्रोशीत छोट्या मोठ्या 80 ते 100 नर्सर्या उभ्या आहेत. 650 एकरात फुलशेती उभी राहिली आहे. येथे एकरी 10 लाख फुले उत्पादित होतात. शिर्डीत दररोज सकाळी गुलाबांचा बाजार भरतो. या व्यसायाकडे तरुण वर्गही आकर्षित झाला असून रोज सकाळी आपल्या दुचाकीवरुन फुलांच्या पिशव्या घेऊन शिर्डीच्या दिशेने जात असतो.
अस्तगावच्या मातीत फुललेल्या गुलाबाचा सुगंध आता सर्वदुर पसरला आहे.अस्तगावातील रोपवाटिकाही ग्राहकांनी फुलु लागल्या आहेत. रोपवाटिकामधील रोपांनाही चांगली मागणी आहे. अस्तगावचे ‘देवयानी’ अधिक दिवस ताज्या राहाणाऱ्या गुलाबांची प्रजातीला सर्वदूर मागणी आहे. शिर्डी- पाठोपाठ आता या फुलांना देशभर मागणी वाढल्याने अस्तगावची फुले पुणे, मुंबई, नाशिक बँगलोरसह देशभरातील बाजारपेठेत पोहोचली आहेत.पारंपारिक शेती सोडून इतर प्रकारची पिके घेण्याचे प्रयोग लोकांचे जीवन बदलत आहेत. देशातली अनेक शेतकरी खरीप आणि रब्बीच्या नेहमीच्या यशाऐवजी फुलशेतीतून चांगला नफा कमावत आहेत, अशा प्रकारे शेती मध्ये नवनवीन – प्रयोग अनेकांचे जीवन आणि विचार बदलत आहेत.