सुपा येथे विमानतळ होणार ? खासदार निलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

औद्योगिक विकास, पर्यटन, संरक्षण आणि कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण पाऊल.
अहिल्यानगर : प्रतिनिधी,
सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचा प्रस्तावही खा. लंके यांनी ठेवला आहे.
खा. लंके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुपा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र आहे. सुपा एमआयडीसीसह अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील कारेगांव व रांजणगांव औद्योगिक वसाहती या परिसरात आहेत. या वसाहतींमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. मात्र विमान सेवा उपलब्ध नसल्याने उद्योगांचे दळणवळण, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि वेळेचे नियोजन या सर्व गोष्टी अडचणीत येतात असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
विमानतळाची सुविधा निर्माण झाल्यास सुपा आणि संलग्न परिसर हा एक मोठा औद्योगिक क्लस्टर बनू शकतो. विमानसेवा उपलब्ध झाल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि स्थानिक रोजगार संधीही मोठया प्रमाणावर उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्पादन मोठया प्रमाणावर पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्येही पाठवले जाते. विमानतळामुळे वाहतूक खर्चात घट होउन उद्योगधंद्यांना मोठा फायदा होईल. विशेषतः निर्यातक्षम वस्तूंच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल.
अहिल्यानगर जिल्हा हे धार्मिक पर्यटनासाठी ओळखले जाणारे ठिकाण आहे. शिर्डी, शनि शिंगणापूर, भिंगार, अहमनगर किल्ला, अष्टविनायक मंदिरांना भेटी देण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देताता. विमानतळामुळे त्यांच्या प्रवासात मोठी सुलभता निर्माण होईल व पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. विमानतळाच्या या मागणीवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे आवाहन खा. लंके यांनी मंत्री किंजारापू नायडू यांच्या भेटीदरम्यान केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, हा निर्णय केवळ सुपा नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
▪️संरक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे – अहिल्यानगर येथे देशातील एकमेव आर्मर्ड कोर सेंटर व टँक फॅक्टरी आहे. संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने या परिसरात ताताडीने हालचाली करण्यासाठी विमानतळ आवष्यक आहे. यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्वपूर्ण पाऊल ठरेल.
▪️कृषी उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत प्रवेश – अहिल्यानगर जिल्हा हा डाळिंब, द्राक्ष, ऊस, कांदा अशा दर्जेदार शेती उत्पादनांसाठी प्रसिध्द आहे. विमानतळ उपलब्ध झाल्यास या उत्पादनांचा निर्यात व्यवसाय अधिक सक्षम होईल. शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठ गाठण्याचा मार्ग मोकळा होईल.
सुपा येथे विमानतळ उभारण्याची मागणी करत खा. नीलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांना निवेदन सादर केले.