खा निलेश लंके यांची पुढील गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिम अकोल्याच्या विश्रामगडावर..

अहिल्यानगर प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि दुर्गसंस्कृतीचे वैभव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचा पुढचा टप्पा अकोले तालुक्यातील ऐतिहासिक विश्रामगडावर शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या आयोजनासाठी आपला मावळा संघटना आणि नीलेश लंके प्रतिष्ठान पूर्णपणे सज्ज झाले असून परिसरातील शिवभक्तांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
या उपक्रमाची घोषणा खा. लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० मार्च रोजी केली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी शिवनेरी किल्ल्यावरून मोहिमेची सुरुवात झाली. धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड यांसह विविध गडांवर मोहिमा यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. दर महिन्याला एका गडावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा सातवा टप्पा आता विश्रामगडावर पार पडणार आहे.
आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोहिमेत राज्यभरातील शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या माध्यमातून केवळ गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन होत नाही तर शिवप्रेमींना एकत्र आणण्याचे कार्यही घडत आहे. या मोहिमेने दुर्गसंवर्धनाची एक नवी चळवळ निर्माण केली असून समाजात याबद्दल सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
या मोहिमेत राज्यभरातील शिवभक्त, स्थानिक नागरिक आणि तरुणाई यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. स्वच्छता आणि संवर्धनाबरोबरच शिवस्मृती जपण्याचा संकल्प खा. नीलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विश्रामगडावर होणारी ही मोहीम शिवभक्तांसाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरणार आहे.