कोर्टातील कडक वकील रंगमंचावर ‘डान्सिंग डॉन’! गुणरत्न सादवर्तेंच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल.

मुंबई : न्यायालयातील गंभीर मुद्द्यांवर नेहमीच ठाम आणि आक्रमक पवित्रा घेणारे वकील गुणरत्न सादवर्ते यांचा एका अनोख्या अवताराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कोर्टात कायद्याच्या धारदार मांडणीसाठी ओळखले जाणारे सादवर्ते अचानक रंगमंचावर गाण्यावर ठेका धरताना दिसले आणि पाहणारे अक्षरशः थक्क झाले.
एका कार्यक्रमात “मैं हूँ जॉन” या गाण्याच्या तालावर त्यांनी दिलेला ठुमका प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला. हॉलमध्ये उपस्थित लोकांनी टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात त्यांचा उत्साह वाढवला. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहताच “हे खरंच तेच वकील सादवर्ते आहेत का?” असा प्रश्न विचारला, तर काहींनी त्यांना प्रेमाने “डान्सिंग डॉन” अशी उपाधी दिली.
प्रत्यक्षात, या अनोख्या डान्समागचं कारण त्यांच्या मुलगी इशाचा आनंद होता. लंडनमधील ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमध्ये इशाने वकिलीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. एलएलबी ऑनर्सनंतर ती बॅरिस्टर होण्यासाठी तयारी करणार असून, परदेशी विद्यापीठात यशस्वीरीत्या निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठीच सादवर्त्यांनी रंगमंचावर ठेका धरला होता.
कोर्टात गंभीर चेहऱ्याने विरोधकांना भिडणारे सादवर्ते अचानक रंगबेरंगी मूडमध्ये दिसल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. “वकील साहेब कोर्टात जितके तडाखेबंद, तितकेच रंगमंचावरही भन्नाट,” असं एका युजरने म्हटलं. थोडक्यात, सादवर्तेंचा हा डान्सिंग अंदाज सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरला आहे.