नगर : आता अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर 30 जुलै रोजी जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा तयार करण्याचा विषय पुन्हा वर काढण्यात आला आहे.
माजी कृषी मंत्री व शिंदे गटात प्रवेश केलेले दादा भुसे यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचा बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संबंधित विषयाच्या संबंधी महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा विषय तापलेला असताना अहमदनगरच्या विभाजनाचे काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री भुसे यांची जी राजकीय वाटचाल आहे ती अधिक सोपी व्हावी म्हणून मालेगाव जिल्हा निर्मिती करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून केले जाऊ शकते, अशी चर्चा चालू आहे.
जर आपण आजपर्यंतचा विचार केला तर शिंदे सरकारने राजकीय सोय लक्षात घेऊन धडाकेबाज निर्णय घेतल्याचे आपण सगळ्यांनी पाहिले आहेत. आणि म्हणूनच हा निर्णय देखील घेण्यात येईल अशी मालेगावकरांना अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे नगरच्या विभाजनाचा ही प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. उत्तर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे करायचे हा प्रश्न सतवतो आहे. म्हणून हा मुद्दा आजपर्यंत तसाच राहिला होता.
ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये या विषयावरून रस्सीखेच सुरू आहे. राज्य पातळीमध्ये या दोघांचे स्थान पाहता राज्य पातळीवर या दोघांपैकी कोणालाही दुखावायला नको म्हणून आतापर्यंत हा निर्णय कोणीही घेत नव्हतं. याशिवाय यातून राजकीय सोय काय होणार हे गणितही प्रभावीपणे पुढे आले नव्हते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर जर मालेगाव जिल्हा झालाच तर नगरच्या विभाजनाला देखील चालना मिळणार का ? सत्तेत असलेले विखे पाटील आणि विरोधातील थोरात यांची यावर काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचे आता लक्ष लागले आहे. राज्यामध्ये नवीन सरकार आल्यानंतर जे प्रलंबित व धोरणात्मक असे विषय होते त्या विषयांवर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यामध्येच हा जिल्हा विभाजनाचा विषय देखील समोर आला आहे. तर आता पाहायचं आहे की या दौऱ्यादरम्यान किंवा या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय निर्णय घेतात.