आत्ताची बातमी

अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. कृष्णा झावरे, उपाध्यक्षपदी ॲड. भाऊसाहेब घुले

नगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील अहमदनगर बार असोसिएशनच्या २०२६ वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. कृष्णा झावरे तर उपाध्यक्षपदी ॲड. भाऊसाहेब घुले यांनी निर्णायक विजय मिळवला. मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीत मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. लक्ष्मण गोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात गुलालाची उधळण, पेढ्यांचे वाटप करत वकिलांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी एकूण १ हजार ८६१ वकिल मतदारांपैकी १ हजार १५७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी सचिवपदी ॲड. विनोद शेटे व खजिनदारपदी ॲड. वसीम खान यांची बिनविरोध निवड झाली होती.अध्यक्षपदाची चौरंगी लढत अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी निवडणुकीत ॲड. कृष्णा झावरे यांनी ५६३ मते मिळवून १८३ मतांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. सुनील भागवत (३८०), ॲड. सुरेश लगड (१३०) व ॲड. संदीप काळे (७४) यांना पराभव स्वीकारावा लागला.

उपाध्यक्षपदासाठी ॲड. भाऊसाहेब घुले यांनी ६८६ मते मिळवत ॲड. स्वाती पाटील (४३८) यांच्यावर २४८ मतांनी मात केली. सहसचिव व कार्यकारिणी निवड महिला सहसचिवपदी ॲड. सारिका झरेकर यांनी ६११ मते मिळवून ॲड. करुणा शिंदे (५१६) यांचा पराभव केला. पुरुष सहसचिवपदी ॲड. अमोल अकोलकर ४५३ मते घेऊन विजयी झाले; ॲड. सारस क्षेत्रे (३४०) व ॲड. रामेश्वर कराळे (३२३) यांना पराभव पत्करावा लागला.

पुरुष कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अजिनाथ कर्डीले (७९२), ॲड. महेश कोतकर (७३४), ॲड. अक्षय म्हस्के (७१५), ॲड. शिवाजी शिंदे (६९२), ॲड. ज्ञानदेव दाते (६६१) व ॲड. प्रमोद खामकर (५६०) हे निवडून आले. महिला राखीव कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. प्राजक्ता करांडे यांनी ६२४ मते मिळवून विजय संपादन केला.

नूतन कार्यकारिणी जाहीर : निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. लक्ष्मण गोरे व सहाय्यक निर्णय अधिकारी ॲड. प्रभाकर शहाणे यांनी जाहीर केली अंतिम कार्यकारिणी अध्यक्ष : ॲड. कृष्णा झावरे, उपाध्यक्ष : ॲड. भाऊसाहेब घुले, सचिव : ॲड. विनोद शेटे, खजिनदार : ॲड. वसीम खान, सहसचिव : ॲड. अमोल अकोलकर, महिला सहसचिव : ॲड. सारिका झरेकर, कार्यकारिणी सदस्य –ॲड. महेश कोतकर, ॲड. अक्षय म्हस्के, ॲड. अजिनाथ कर्डीले, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. ज्ञानदेव दाते, ॲड. प्रमोद खामकर व ॲड. प्राजक्ता करांडे.

युवा नेतृत्वाकडे धुरा : नव्या कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी युवा असल्याने बार असोसिएशनची धुरा युवकांच्या हाती गेली असल्याचे चित्र आहे. यामुळे संघटनेच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य येण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. नूतन अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे म्हणाले, “वकील बंधू-भगिनींनी मोठ्या बहुमताने माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला पात्र ठरत वर्षभर विविध उपक्रम राबवून वकिलांचे प्रश्न, प्रलंबित समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ. सर्व सहकारी पदाधिकारी आणि वकीलवर्गाला सोबत घेऊन संघटनेच्या हितासाठीच काम करणार आहे.”

पारनेर तालुक्यात जल्लोष : कृष्णा पंडितराव झावरे हे पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी असून ॲड. शहाजी दिवटे यांच्यानंतर ॲड. झावरे रूपाने तालुक्यातील विधिन्याला दुसऱ्यांदा जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निकालापूर्वीच झावरे यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट फिरत होत्या. अपेक्षेप्रमाणे झावरे यांनी या निवडणुकीत एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर टाकळीढोकेश्वरसह तालुकाभर एकच जल्लोष झाला. यापूर्वी सन २०१७ /१८ मध्ये झावरे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा न्यायालयात ते गेल्या १९ वर्षापासून कार्यरत आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!