माता अनुसया प्रोडक्शन तर्फे बाल कलाकारांना ज्येष्ठ अभिनेत्री सोबत काम करण्याची संधी.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
माता अनुसया प्रॉडक्शन ही संस्था गेली 24 वर्षे बालकलाकारांसाठी कार्यरत आहे. लहान मुलांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या ध्येयाने प्रवीण कुमार भारदे सरांनी ही संस्था सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी मुंबईतुन सुरुवात केली. त्यांनी लावलेल्या या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ही संस्था यशस्वीपणे कार्य करत आहे.
आजपर्यंत माता अनुसया प्रॉडक्शनने 2500 पेक्षा जास्त बालनाट्याचे प्रयोग यशस्वीरित्या केले आहेत. मुलांना कलाकारांसोबत अभिनय करण्याचा अनुभव मिळावा म्हणून भारदे सरांनी अनेक कलाकारांना विचारले. भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांना सुद्धा विचारले त्यावेळेस भारदे सरांची मुलांसाठीची ही तळमळ पाहून नयना आपटे यांनी लगेच होकार दिला.
आज गेली 17 वर्षे या संस्थेत त्या कार्यरत आहेत. नयना आपटे यांनी या संस्थेच्या कार्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. रंगमंचावर कसा वावर केला पाहिजे, अभिनय म्हणजे काय व तो कसा केला पाहिजे, चेहऱ्यावरचे हावभाव कसे करायचे याचे मार्गदर्शन नयना आपटे स्वतः मुलांना करतात. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना मोठ्या कलाकारांच्यासोबत रंगमंचावर अभिनय करण्याचा अनुभव मिळतो. माता अनुसया या संस्थेची ही चळवळ शहरांपुर्ती मर्यादित नसून गावोगावी जाऊन ही संस्था कार्य करत आहे.
गावांतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शिबिरे आयोजित केली जातात व नयना आपटे स्वतः या शिबिरात सहभाग घेऊन मार्गदर्शन करतात. 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत माता अनुसयाचे पुण्यातील विविध नाट्यगृहात बालनाट्याचे आठ प्रयोग अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. प्रवीण कुमार भारदे सरांनी ही बालनाट्ये जास्तीत जास्त मुलांनी पहावीत म्हणून तिसरी पर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश व त्या पुढील मुलांना हाफ तिकीट ठेवले असल्याने मोठ्या संख्येने मुलांनी या बालनाटयाचा आनंद घेतला. 28 डिसेंबर रोजी बालगंधर्व या नाट्यगृहात भीमचा वाढदिवस व वाघोबाचं नाटक या बालनाटयाने सांगता झाली.
सर्व बालकलाकारांना जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देण्यात आले. नयना आपटे यांनी सर्व मुलांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस पालकांसोबत व रसिकांसोबत बोलताना त्या म्हणाल्या की मुलांना कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून गेली 17 वर्षे मी या संस्थेत कार्य करत आहे व इथून पुढेही करेल तसेच इतर कलाकारांनी सुद्धा सहभाग घ्यावा. या संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना चित्रपट, मालिका, जाहिरात व वेब सिरीज मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रवीण कुमार भारदे सर व नयना आपटे यांनी मुलांसाठी बालनाट्यची सुरू केलेली ही चळवळ व त्यासाठी अविरतपणे मेहनत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात बालनाट्याचे प्रयोग करीत आहेत त्यांच्या या कार्यास मनापासून सलाम. विद्या पारखे मॅडम, प्रशांत शेटे सर व संपूर्ण टीमचे योगिता गोसावी यांनी मनापासून आभार मानले.