पाणी योजनांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करा खा निलेश लंके यांनी वेधले लोकसभेचे लक्ष.
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ८३० पाणी योजना मंजुर झाल्या असून या पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याने या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत केली.
सभागृहात पाणी योजनांमधील गैरप्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधताना खा. लंके म्हणाले, पाणी ही निसर्गाचे वरदान आहे ते जपून वापरण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला आहे. त्याच धतवर केंद्र शासनाने हर घर नल, और हर घर जल अशी घोषणा देत अतिशय महत्वपुर्ण जलजीवन मिशन ही योजना राबविली आहे. या योजनेसंदर्भात माझ्या मतदारसंघाचा जरी विचार केला तर त्यात ८३० योजना मंजुर झाल्या आहेत.
त्यासाठी १ हजार ३३८ कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या योजनांच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखरेख केली जाते. जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या असून केंद्रीय समितीमार्फत या योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी खा. लंके यांनी केली.
लोकसभेत गेल्यानंतर खासदार नीलेश लंके हे जल जीवन योजन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. जिल्हा विकास सनियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतही खा. लंके यांनी आक्रमक भूमिका घेत या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. माझ्यासोबत चला मी तुम्हाला या पाणी योजनांमधील भ्रष्टाचार दाखवितो भ्रष्टाचार नसेल तर मी राजिनामा देतो अशी आक्रमक भूमिका घेत खा. लंके यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आव्हान दिले होते. या पार्श्वभुमीवर खा. लंके यांनी संसदेमध्ये पुन्हा या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.