शेतात बॉडी; हात बांधलेले; खिशात ST चं तिकीट अन् परफेक्ट कार्यक्रम होता-होता राहिला..
पोटच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पहिल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे घडला होता. कुठेही सबळ पुरावे नसताना पोलिसांनी योग्य दिशेने तपास करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या खुनात मृत तरुणाच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मयताच्या पत्नीसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली. घटनास्थळावर मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र, मृत तरुणाच्या खिशामध्ये असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका तिकिटाच्या मदतीने पोलीस तपास थेट मध्य प्रदेश आणि मग गुजरात राज्यातील पोरबंदर गावापर्यंत जाऊन पोहोचला.मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने सुरू केला.
मृत तरुणाच्या अंगठ्याजवळ मुकेश नाव असल्याचे दिसून आले. मात्र, त्या पुढील अक्षरे मृतदेह खराब झाल्यामुळे वाचणे अवघड होते. त्यातच मृतदेहाच्या खिशात असलेल्या तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूरपर्यंत आल्याचे निदर्शनास आले. तिकिटावर असलेली तारीख पाहता सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेजमध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे निदर्शनास आले यावरूनच या गुन्ह्याची उकल झाली.मृत मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता.
त्यामुळे संबंधित महिला ही सुशील पावरा या प्रियकरासोबत राहत होती. मुकेश बारेला याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. ही दोन्ही मुले मुकेशकडेच राहत होती. मात्र, मुकेश बारेला हा या मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून त्याच्या पत्नीने त्याचा काटा काढण्यासाठी हा खून केल्याची कबुली दिली आहे.