चर्मकार विकास संघाने मागितला खा.राणांचा राजीनामा , पाहा काय आहे प्रकरण …
📍नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन अनु. जातीला न्याय द्यावा..
📍संविधान दिनी हजारो चर्मकार बांधवांच्या उपस्थितीत राणा यांना संविधान भेट देवून गांधीगिरी..
📍चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांची माहिती ..
अमरावती – दि. १२ नोव्हेंबर
अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या जागेवर 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या व मुंबई उच्च न्यायालयात बनावट जात प्रमाणपत्र रद्द केल्याने नवनीत रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी निवेदन देऊन अनुसूचित जातीला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या अमरावती मधील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आपण अमरावती लोकसभा मतदार संघातून अनुसूचित जातीच्या जागेवर 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आला आहात. आपल्या बनावट जातीच्या प्रमाणपत्र विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 2021 मध्ये आपल्या विरोधात निकाल लागला असून आपले बनावट जातीचे प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपले जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे म्हणून आपण अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या जागेवर खासदार म्हणून कार्यरत राहणे उचित नाही. आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर व सन्मान करून आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन अनुसूचित जातीला न्याय द्यावा.
निवेदनात प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पुढे म्हटले आहे की, आपण अनुसूचित जातीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असताना आपल्यात संत रविदास महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभाव दिसून येत आहे. आपल्या खासदारकीच्या काळात आपण अनुसूचित जातीच्या प्रश्नांची दखल घेतली नाही व संसदेत अनुसूचित जातीचे बेरोजगारी महागाई अशा गंभीर प्रश्नावर आवाज उठविला नाही. तसेच अनुसूचित जातीच्या महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सतत घडत असताना आपण महिला खासदार असून सुद्धा महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या घटनेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कधीही पुढे आल्या नाहीत व महिलांना न्याय दिला नाही याचा खेद वाटतो.
आपले बनावट जात प्रमाणपत्र रद्द केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार करून आपण अनुसूचित जातीच्या जागेवर अतिक्रमण करून फसवणूक केल्याची आता तरी जाण ठेवून अनुसूचित जातीच्या न्याय देताना दहा दिवसात आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा.
अन्यथा राज्यातील सर्व अनुसूचित जातीच्या संघटना एकजुटीने आपल्या खासदारकीचा राजीनामा करिता अमरावतीत तीव्र आंदोलन छेडतील व होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून हजारो अनु.जाती चर्मकार बांधवांच्या उपस्थितीत खासदार नवनीत रवी राणा यांना संविधानाची प्रत भेट देण्यात येणार आहे.