ग्रामीण भागात तरुण बेरोजगाराच्या संख्येत वाढ !!
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगांव तालुक्यातील मोठ-मोठ्या गावांपासून ते काही खेडे-गावांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तालुक्यातील शैक्षणिक संस्था कॉलेज जसजशी वाढत गेली त्या प्रमाणातच सुशिक्षित व पदवीधर बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे शिकून काय भलं व्हायचं, असा प्रश्न पालकांसह शिकलेल्या पदवी धारकांनाही पडत आहे.
ग्रामीण भागात गाव तेथे महाविद्यालय व लहानवाडी तेथे शाळा या शासनाच्या धोरणानुसार शिक्षणाची गंगा वाड्यावस्त्यांवर व गल्ली बोळात जाऊन पोहोचली आहे. सर्वच क्षेत्रात बेरोजगारीची झळ सोसणारा तरुण वर्ग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू इच्छित असताना अनियमित पावसामुळे दुष्काळी स्थितीत पाण्याची समस्या बेरोजगारांना भेडसावत आहे. तालुक्यात गावोगावी असंख्य पदवीधर झाले खरे परंतु पदवीचे गुणपत्रक हातात पडल्यानंतर नोकरी मिळत नसल्याने व शेतीची अवस्था वाईट असल्याने “ना घरका ना घाटका’ प्रमाणे शेतीही जमत नाही व नोकरीही मिळत नाही, अशा स्थितीत तरुणवर्ग सापडला आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत भर पडत चालली आहे. सोयगांव तालुक्यात तालुक्यातील बेकार वर्ग आज मुंबई, औरंगाबाद सारख्या शहरांकडे धाव घेऊ लागला आहे. तर काही सुशिक्षित बेरोजगार बेकायदेशीर धंद्यामध्ये गुरफटू लागला आहे.
उरलेले अवैध प्रवासी वाहतुकीच्या मागे लागल्याचे दिसत आहेत. एकंदरीत सोयगांव तालुक्यात पसरलेल्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्या बरोबर बेकारीचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील या सुशिक्षित वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्याची वेळ आता आली आहे.