खा. लंके यांच्या समर्थनार्थ भाळवणीत उपोषण; सुधाकर रोहोकले शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक

पारनेर : प्रतिनिधी,
कांदा तसेच दुधाच्या दरवाढीसाठी खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर रोहोकले यांनी भाळवणी येथे आमरण उपोषण करणार आहेत.
या आंदोलनासंदर्भात सुधाकर रोहोकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले असून त्यात नमुद करण्यात आले आहे की, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दि.५ जुलै पासून कांदा व दुधाच्या हमीभावासाठी शेतकरी जनआक्रोश आंदोलन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी, शेतकऱ्यांना भेटण्याची तसदी न घेता ते निघून गेले. जिल्हयाचे पालकमंत्रीही आंदोलनस्थळी फिरकले नाहीत.
दि.६ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांची तड लागली नाही तर आपण शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या समर्थनार्थ बेमुदत अमरण उपोषण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, सुधाकर रोहोकले यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भाळवणी येथे ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान चार दिवस तर २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान आठ दिवस असे दोनदा आमरण उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळयाच्या मागणीसाठीही रोहोकले हे सरसावले असून शनिवारी या आंदोलना तोडगा निघाला नाही तर रोहोकले हे अमरण उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.