मेलेल्या मुडद्यालाही जात लावली जाते, दलिताच्या मृतदेहाची कोल्हापुरात पहा कशी केली चेष्टा.
मेल्यानंतर हि जातीभेद संपत नाही, वा रे कोल्हापूर … चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात तब्बल ८ तास मृतदेह अंत्यसंस्कार विना ठेवावा लागला. कारण गावकऱ्यांच म्हणन होत कि हि जागा आमची आहे, मेलेल्या मुडद्याला आता जात लावली जाते , किती हि पुरोगामिचा झेंडा मिरवला तरी अश्या घटना घडत आहेतच. दलित समाजाची हेळसांड सुरूच आहे, नजर टाकूयात या प्रकरणावर…पुरोगामी विचारांच्या आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत एक दुर्देवी घटना घडली आहे. दलित समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीला काही लोकांनी विरोध केला. यामुळे चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात तब्बल ८ तास मृतदेह अंत्यसंस्कार विना ठेवावा लागला. यामुळे या गावात शनिवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर नेहमीप्रमाणे गावच्या जवळील स्मशानभूमीत दफनविधी करण्यासाठी येथील दलित नागरिक खोदाई करण्यासाठी स्मशानभूमीत गेले. मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. काही ग्रामस्थांनी विरोध केल्याने येथील दलित नागरिकांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला होता. मात्र तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी समजूत काढल्यानंतर आठ तासानंतर रात्री उशिरा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत प्रभू कांबळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद निर्माण झाला. हा वाद शिगेला गेल्याने दलित समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारत प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन सुरू केले.
जागेविषयी वाद असल्याने तुमच्या खासगी जागेत यावेळी अंत्यविधी करा आणि त्यानंतर यावर तोडगा काढू, असे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितल्यावर दलित समाजातील नागरीक तयार झाले. मात्र त्यातील काही नागरिकांनी नकार दिला. प्रत्येकवेळी प्रशासन असेच सांगते आणि वेळ मारून नेते. त्यामुळे यावेळी याबाबत तोडगा काढल्याशिवाय अंत्यविधी होणार नाही म्हणत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. दरम्यान सरपंच, उपसरपंच , माजी सरपंच, पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने दलित समाजातील नागरिकांची समजूत काढत स्वमालकीच्या जागेत अंत्यविधी केला.
या प्रकरणामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. कित्येक वर्षांपासून हलकर्णी गावाजवळील स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून याविषयी वाद निर्माण झाला आहे. शनिवारीही वाद निर्माण झाल्याने संबंधित जागेजवळील नागरिकांनी ती जागा तुमची असेल तर त्याचे पुरावे आणा, असे तहसीलदार रणवरे आणि पोलीस निरीक्षक घोळवे यांनी सुनावताच ते निरुत्तर झाले. त्यानंतरही प्रशासनाने कठोर भूमिका न घेताच दलित समाजातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.