महापुरुषांना जातीधर्माच्या चौकटीतून बाहेर काढायला हवं – राजेंद्र देवढे
पाथर्डी | प्रतिनिधी : वजीर शेख
गौतम बुद्धांपासून फुले-शाहू-आंबेडकरांपर्यंत चालत आलेल्या पुरोगामी चळवळीतील महापुरुषांत महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. शैव-वैष्णव वाद पराकोटीला पोहोचलेला असताना शैव परंपरेशी प्रामाणिक व ठाम राहून बसवेश्वरांनी सामाजिक,राजकिय,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत दिलेले योगदान अतुलनीय आहे.महापुरुष ही कुणा ठराविक समाजाची मक्तेदारी नसून ती राष्ट्रिय संपत्ती आहे.त्यामुळे महापुरुषांना जातीधर्माच्या चौकटीतून बाहेर काढायला हवं.असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र देवढे यांनी केले.
वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील पिनाकेश्वर मंदिरात क्रांतीसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी शंकर महाराज मठाचे महंत परमपूज्य माधवबाबा,प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश मंत्री,प्रभाकर इजारे,अं.नि.स.चे तालुकाध्यक्ष शशीकांत गायकवाड,सुवर्णयुग परीवार ट्रस्ट चे संस्थापक बाळासाहेब जिरेसाळ,हाजी हुमायून आतार,माजी नगरसेवक रमेश गोरे, बद्रीशेठ पलोड,बाळासाहेब चिंतामणी,दयानंद जिरेसाळ,जावेद मणियार आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान शाहीर भारत गाडेकर यांनी शाहीर वामनदादा कर्डक यांची, ‘वंदन माणसाला’ ही रचना पहाडी आवाजात सादर केल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. लिंगायत संघर्ष समितिच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष जिरेसाळ,तालुकाध्यपदी सचिन फुटाणे,शहराध्यक्षपदी सुहास शेळगावकर यांची निवड झाल्याने उपस्थित मान्यवर व समाज बांधवांचे वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी, माधवबाबा म्हणाले,महापुरुषांची जयंती साजरी करण्यापाठीमागे त्यांचे विचार समाजाने अंगीकृत करावेत हा उद्देश असतो. अनेकदा जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते. परंतु त्या महापुरुषांच्या विचारांची पेरणी समाजात होताना दिसत नाही. महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाने उचललेले वैचारीक मंथनातून महापुरुष समजुन घेण्याचे हे पाऊल निश्चितच सर्व समाजाला एक उभारी देणारे ठरले आहे. झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक रचनेविषयी बोलताना अविनाश मंत्री म्हणाले, येणाऱ्या काळात समाजात धर्म व जात नसेल. मग संस्कार देणार कोणते ? मोबाईल संस्कृतीमुळे बुद्धीला गंज चढला असल्याने जीवन जगण्याचा आदर्श नाहिसा झाला आहे.कमीपणा घेणारी माणसं सापडत नाहीत.सामाजिक संतुलन साधण्यासाठी धार्मिक विचारांची नितांत गरज आहे.
संतोष जिरेसाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कवी बाळासाहेब कोठुळे यांनी सूत्रसंचालन केले तर पुरुषोत्तम इजारे यांनी आभार मानले. सुरेश इजारे,संजय चेलवे,दत्तात्रय टेंभूरकर,संजय होनमणे,दत्तात्रय इजारे,अभिजीत गुजर,सचिन फुटाणे, शिवाजी सूपेकर,प्रसाद जिरेसाळ, संतोष बुरसे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.