हृदयद्रावक ! खारे कर्जुने गावात काळीज पिळवटणारी घटना, 6 वर्षांची चिमुकली बिबट्याने उचलली.

नगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात भीतीदायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. गावातील एका सहा वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची घटना इतिहासात पहिल्यांदा घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील गायकवाड कुटुंब सायंकाळी सातच्या सुमारास शेतामध्ये थंडी वाढल्याने सर्व जण शेकोटीजवळ बसलेले होते. त्यावेळी रियंका सुनिल पवार ही सहा वर्षांची मुलगी शेजारीच खेळत होती. अचानक शेजारील तुरीच्या शेतातून एक बिबट्या आला आणि क्षणात काही कळायचा आत रियंकाला उचलून नेले. कुटुंबीयांनी आरडाओरड करून परिसरात शोध घेतला, परंतु अंधाराचा फायदा घेत बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगितले की, गावाच्या परिसरात एकूण तीन बिबटे फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक मादी बिबटी असून, तिच्यासोबत दोन पिल्ले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सोबत २ आणखी बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या भागात बिबट्यांची हालचाल वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. शोध मोहीम आणि उपाय योजना : घटनेनंतर वन विभाग, पोलिस, डॉग स्क्वॉड तसेच बिबट्या डिटेक्ट मशीनसह पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून, मुलीचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. मात्र आत्तापर्यंत मुलगी सापडलेली नाही, त्यामुळे ती जिवंत आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
गावकऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे कि, रात्री शेतामध्ये किंवा एकांतिक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शेजारील इसळक, निंबळक, हिंगणगाव, जखनगाव आणि निमगाव घाणा या गावांमध्येही सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



