बेकायदेशीर कामांना माझे कधीच पाठबळ नाही लवजिहाद प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न – खा. लंके
पारनेर : प्रतिनिधी,
बेकायदेशीर कामांना मी कधीही पाठीशी घालत नाही. त्यामुळे एखाद्या बेकायदेशीर कामासाठी पोलीसांवर मी दबाव आणला असे सांगून एखाद्या प्रकरणाशी माझा संबंध जोडून प्रतिमा मलीन करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणी देवराम उर्फ गणेश सीताराम धात्रक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सबांधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संगमनेरमधील लव जिहाद प्रकारणी मी पोलीसांवर दबाव आणल्याचे चुकीचे वृत्त काही पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले आहे. वास्तविक अशा प्रकरणासंदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. जरी कोणी अशासाठी संपर्क केला तरी आपण अशा कामांना मी कधीही पाठीशी घालत नाही. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला नसून आगामी विधानसभा निवडणूका डोळयापुढे ठेऊन राजकीय हेतून कोणीतरी वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे.
खा. लंके म्हणाले, फोटो कोणीही कुणासोबत काढू शकते. त्याचा संबंध जोडून एखाद्यावर बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. राजकीय हेतूने प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असून ते समजण्याइतकी नगर जिल्हयातील जनता सुज्ञ आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर माध्यमांनी या निवडणूकीत जातीय ध्रुवीकरणाबाबत मला प्रश्न विचारले असता मला सर्व धर्मियांनी भरभरून मतदान केल्याचे आपण स्पष्ट केलेले आहे. माझ्या मतदारसंघासह राज्यभर माझे सहकारी आहेत. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत हे मलाही माहीती नाही. कारण केवळ मानवता माणणारा कार्यकर्ता असल्याचेही खा. लंके यांनी स्पष्ट केले.
बदनामी करणारांवर कारवाई करा –
खा. नीलेश लंके यांची तसेच घारगांव गावाची बदनामी केल्याप्रकरणी घारगांव ता. संगमनेर येथील देवराम उर्फ गणेश सीताराम धात्रक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आमच्या गावाच्या नावाने निखालस खोटा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकुर प्रसारीत करून आमच्या गावाची तसेच खा. नीलेश लंके यांची बदनामी करण्यात आली आहे. दोन पोर्टलवर यासंदर्भात बातमी प्रसिध्द करण्यात आली असून ती दिशाभूल करणारी आहे. काही विघ्नसंतोषी लोक गावाच्या नावाचा वापर करून गावाची, जिल्हयाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सबंधित पोर्टलवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.