कर्जुले हर्या गणात लंके यांना मताधिक्य मिळणार;युवा नेते सचिन गोडसे यांना विश्वास
गणामध्ये पुणे आणि मुंबई स्थित पारनेरकरांची संख्या अधिक आहे. ते आपल्या मूळ गावी मतदार सुद्धा आहेत. या ठिकाणी खा.नीलेश लंके यांचा प्रभाव आहे. शिवसेना तालुकाप्रमुख असताना या ठिकाणी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना मताधिक्य मिळणार हे काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. असा विश्वास धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवा नेते सचिन गोडसे यांनी व्यक्त केला.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राणीताई लंके यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यातली त्यात पठार भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहेत. विशेष करून कर्जुले हर्या गणातील तेरा गावांमधील अनेक जण नोकरीवासानिमित्त मुंबई आणि पुणे या ठिकाणी स्थिरावले आहेत. विधायक बाब म्हणजे या सर्व कुटुंबाचा आपल्या मूळ गावी संपर्क आहे. त्यापैकी अनेक जण आपापल्या गावातील राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यापैकी काहीजण ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि उपसरपंच सुद्धा आहेत. परिणामी हा जरी ग्रामीण भाग असला तरी त्यावर शहरी मतदारांचा प्रभाव आहे.
मुंबईत राहणाऱ्यांपैकी बहुतांशी जण शिवसैनिक आहेत. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अनेक जण प्रभावित होऊन सुरवातीपासून या पक्षाचे काम करतात. दरम्यान खासदार नीलेश लंके शिवसेनेत असताना ते तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांनी पठार भागातील शिवसैनिकांना संघटित करीत वज्रमुठ बांधली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवली त्यावेळी सुद्धा कर्जुले हर्या आणि परिसरातील गावांमधून मताधिक्य मिळाले. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही खासदार लंके यांना या भागातील लोकांनी खऱ्या अर्थाने पाठबळ दिले. आता तुतारी या चिन्हावर राणीताई लंके या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. दरम्यान खा. लंके यांनी केलेले काम आणि राणीताई लंके यांच्या रूपाने पहिल्या महिला आमदार विधानसभेत जाव्यात अशी धारणा येथील लोकांची झालेली असल्याचे मत युवा नेते सचिन गोडसे यांनी व्यक्त केले.
अडीच वर्षांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावून घेण्यात आले. ही गोष्ट सर्वसामान्य शिवसैनिक आणि नागरिकांना पटलेली नाही. त्याला कर्जुले हर्या गणातील शिवसैनिक आणि मतदार सुद्धा अपवाद नाहीत. आपला स्वाभिमान जपण्यासाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला धडा शिकवण्यासाठी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या गणातील मतदार नक्कीच तुतारी वाजवतील असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे.