सोयगाव तालुक्यातील जरंडी ची आदर्श ग्रा.पं च्या दिशेने वाटचाल सुरु; शनिवारी केले व्यायामशाळेचे उदघाटन
विजय चौधरी सोयगाव तालुका प्रतिनिधी
आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.1) जरंडी गावातील तरुणांसाठी व्यायामशाळेचा शुभारंभ करुन आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने पुन्हा एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे.जरंडीचे उपसरपंच संजय गिरधर पाटील यांच्या हस्ते शनिवारी या व्यायामशाळेचे उदघाटन करुन लोकार्पण करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे यांच्यासह समस्त ग्रा.पं सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती.औरंगाबाद-जळगाव जिल्हयाच्या सीमेवर डोंगराळ भागात वसलेल्या सोयगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसत असतांना जरंडी ग्रामपंचायतीने मात्र सरपंच वंदनाबाई राजेंद्र पाटील उपसरपंच संजय गिरधर पाटील सदस्य मधूकर लोटन पाटील, सुरेश यावगी व ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामांचा धडाका लावल्याचे दिसत आहे. सरपंच,उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला जरंडी ग्रा.पं चे समस्त सदस्य व नागरिक सकारात्मक रित्या प्रतिसाद देवून सहकार्य करीत असल्याने पाच हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीने विकासात्मक कामात आघाडी घेऊन आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.विकासात्मक कामांचा हाच वेग कायम राहील्यास येणाऱ्या वर्षात आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार प्राप्त करणारी तालुक्यातील पहिली ग्रा.पं ठरेल असा अंदाज राजकीय अभ्यासकांन कडून वर्तविला जात आहे.
………………………………………………………………….
जरंडी ग्रामपंचायतीने केलेली विकासात्मक कामे
ग्रामपंचायतीने पीठाची गिरणी सुरु केली असून शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांना वर्षभर मोफत दळण दिले जाते. अंगणवाडीतील मुलांसाठी पाळणा घर,खेळणी व कचरा कुंडी चे नियोजन केले असून वातानुकूलित शवपेटीची व्यवस्था केली आहे. लोकवर्गणीतून 50 लक्ष रुपयांचे मंगल कार्यालय बांधले असून 2 लक्ष रुपयांच्या लोकवर्गणीतून लोखंडी पुलाचे बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी शासना कडून एक रुपयांचा निधी घेतलेला नाही.गावात 8 ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहे. तरुणांसाठी वाचणालय व व्यायामशाळा सुरु केली. नागरिकांना फिल्टर पाणी व गरम पाणी उपलब्ध करुन दिले आहे.त्यासाठी सोलर पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी डिजिटल शुभेच्छा स्क्रीनची व्यवस्था.दिव्यांग नागरिकांना 20 लिटर जार व वर्षभर मोफत फिल्टर पाण्याचे वाटप.स्मशानभूमीचे सुशोभीकरण व बाकड्यांची व्यवस्था. महिलांना धुणे धुण्यासाठी धोबी घाट बांधकाम.गावातील ओल्या व सुख्या कचऱ्याचे घंटागाडी व शोष खड्ड्याचा वापर करुन योग्य नियोजन. गावातील सर्व विद्युत पोलवर एलईडी बल्ब बसविण्यात आले आहे.गावात पाच हजार झाडांचे रोपण. लहान मुलांसाठी खेळणी व घसरगुंडीची व्यवस्था केली असून नागरिकांना कडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कर वसूलीतून या सुविधांचा खर्च भागविला जातो.
………………………………………………………………….
या सोबतच जरंडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक व शासकीय उपक्रम ही उत्साहात साजरे केले जातात.दरम्यान विकासात्मक कामात आघाडी घेणारी जरंडी ग्रा.पं सोयगाव तालुक्यातील एकमेव व पहिली ग्रा.पं असून केंद्रीय सचिव प्रियांका दत्ता व बुध्दीत बॅरीक यांनी जरंडी ग्रा.पं ला भेट देवून ग्रा.पं च्या कामाचा गौरव केलेला आहे.शनिवारी (दि.1) ग्रा.पं ने तरुणांसाठी नवीन व्यायामशाळा सुरु करुन आदर्श ग्रा.पं च्या स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे.
………………………………………………………………….
कोव्हीड काळात आम्ही गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलेले आहे.गावातील करवसूली शंभर टक्के असून घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी मोफत कचऱ्या कुंड्या दिल्या जाणार असून गावातील तरुणांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासीका सुरु करण्याचा आमचा माणस आहे.
सुनिल मंगरूळे ग्रा.वि अधिकारी जरंडी