मा महापौर अभिषेक कळमकर यांनी नगर शहरातील चेन स्नॅचिंगचे वाढते गुन्हे रोखण्याबाबत एस पी ना निवेदन दिले
नगर शहर तसेच सावेडी, केडगाव उपनगरात मागील काही काळात महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात, परंतु अशा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास व मुद्देमाल परत मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. अशा घटनांमुळे महिला एकट्या दुकट्या घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
कारण त्यांच्या सौभाग्य अलंकारांवर कोण कधी येऊन डल्ला मारेल याची शाश्वती राहिलेली नाही. लाखमोलाचे दागिने चोरटे भरदिवसाही धूम स्टाईलने येऊन ओरबाडून नेतात. पोलिस तपासात असे गुन्हे करणारे आढळून येत नाही. मग पोलिसांचे गुन्हे शोध पथक नेमकं काय काम करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजच व्रत वैकल्याचा श्रावण महिना सुरू झाला आहे. विविध मंदिरात महिला भाविक आवर्जून दर्शनासाठी जातात. मात्र चेन स्नॅचिंगच्या प्रकारामुळे महिला वर्ग भयभीत आहे. त्यांना स्वतःच्या आणि दागिन्यांच्या सुरक्षेची काळजी आहे. पोलिसांनी असे प्रकार घडणाऱ्या परिसरात गस्त वाढवण्याची गरज आहे. फक्त गुन्हे दाखल केले म्हणजे पोलिसांचेही काम संपलं असे नाही तर गुन्हेगारांना शोधून जेरबंद करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.
मध्यंतरी खासदार निलेश लंके यांनी पोलिस दलातील भ्रष्टाचाराबद्दल उपोषण केले. त्यामुळे आधीच जनतेमध्ये पोलिस प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी आहे. अशा वेळी असे वाढते गुन्हे रोखुन पोलिसांनी समाजाला विश्वास देणे अत्यावश्यक आहे. यासाठी संपूर्ण शहर व उपनगरात गस्त वाढवून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आवर घालणे आवश्यक आहे. तसेच आतापर्यंतच्या गुन्ह्यांमधील आरोपी जेरबंद करून पिडितांना त्यांचा सुटलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. या गंभीर प्रश्नाची दखल न घेतल्यास येत्या काळात पोलिस अधीक्षक कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.