महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी एमईटी आणि डेल्फिक कौन्सिल ऑफ महाराष्ट्रची हात मिळवणी
मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एमईटी) आणि डेल्फिक कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी राज्यातील कला आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी हातमिळवणी करत एक संयुक्त करार केला आहे. आंतरराष्ट्रीय डेल्फिक चळवळीची २८ वर्ष पूर्ण होत असल्यानं या निमित्ताने एमईटी आणि एमईटी ऋषीकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक ७० मीटर लांबीच्या लाइव्ह आर्ट वॉल कॅनव्हास पेटिंगमध्ये ‘पाणी’ या थीमभोवती महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
डेल्फिक आर्ट वॉल या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालव आणि कलाकार नीलेश मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कार्य़क्रमात एमईटी विश्वस्त पंकज भुजबळ, आंतरराष्ट्रीय डेल्फिक कौन्सिलचे महासचिव रमेश प्रसन्ना, महाराष्ट्र डेल्फिक कौन्सिल अध्यक्ष सुरेश थॉमस, हंगामा म्युझिक उपाध्यक्ष सौमनी पॉल, डेल्फिक कौन्सिल महाराष्ट्राचे मुख्य सदस्य अभिजीत भुजबळ, अनुजा सहाय, अली अकबर रिझवी, दिप्ती शाह, सेजल गाला आणि सुशील मिस्त्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते.
डेल्फिक आर्ट वॉल या कार्यक्रमात एमईटी संस्था आणि एमआरव्हीच्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी व्हावी, यासाठी डेल्फिक गेम्स २०२३ दरम्यान ही पेंटिंग्ज विविध राज्ये आणि देशांसोबत एकत्र करून ११ किमी लांबीची आर्ट वॉल तयार करणार आहे. समाजात कला आणि संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणं हा डेल्फिक चळवळ मुख्य उद्देश आहे.
“डेल्फिक आर्ट मूव्हमेंटने एमईटी आणि एमआरव्हीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन घडविण्याची संधी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे, कला आणि संस्कृतीचा विकास हा जलसाठाभोवती झाला आहे, हे एकमात्र सत्य आहे. तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी डेल्फिक कौन्सिसची मदत होत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे,” असे पंकज भुजबळ म्हणाले.
या कार्य़क्रमात एमईटी आणि एमआरव्हीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य जसे की, तारपा नृत्य, ढोल नृत्य, आदिवासी नृत्य आणि नंदी नृत्य अशा विविध कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. एमईटीच्या विद्यार्थ्यांच्या फॅशन शो ने या कार्यक्रमाची सांगता झाली. या उत्सवात एसईटी ने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठ डेल्फिक क्लबची घोषणा सुद्धा केली आहे. शोच्या थीममध्ये डेल्फिक आर्ट वॉल लाइव्ह पेंटिंगसह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे पोशाख प्रदर्शित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र डेल्फिक कौन्सिलचे अध्यक्ष सुरेश थॉमस म्हणाले की, “महाराष्ट्राची संस्कृती आणि कला ही विविध गोष्टींनी निटलेली आहे. या कलासंस्कृतीचे दर्शन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांमध्ये आणि जगातील इतर भागांमध्ये दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे मिशन आहे.”