नगर ब्रेकिंग : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी झाली फरार.

आपण लग्नाच्या बाबतीत भरपूर काही गोष्टी ऐकत असतो. लग्नाच्या बातम्या देखील आपण ऐकले व पाहिले असेल. वा आपल्या आसपास घडलेले आहेत. कधी नवरदेवाचे दुसरीकडे प्रेम असते, तर कधी नवरीचे दुसरीकडे प्रेम असते. कधी नवरा पळून जातो, तर कधी नवरी पळून जाते. अशीच घटना आपल्या अहमदनगर मधील वाळकी गावात घडली आहे. लग्न म्हटलं की दोन परिवारात निर्माण होतो तो म्हणजे विश्वास आणि या विश्वासातून नवीन नाते तयार होत असते. या लग्नामुळे दोन परिवार एकत्र येत असतात. आणि पती आणि पत्नीच्या संसाराची सुरुवात लग्नानंतर होत असते. लग्नानंतर हेच पती-पत्नी सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. आपल्या आजच्या बातमीमध्ये याच नात्याचा विश्वासघात करणारी घटना घडली आहे. नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये नवरीच्या बापाला दीड लाख रुपये देऊन लग्न करून आणलेली नवरी लग्नाच्या पहिल्याच रात्री पळून गेली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, या गावातील दोन वर मुलांचे लग्न जमवावे म्हणून औरंगाबाद येथील एका मध्यस्तास सांगितले होते. त्यानंतर या मध्यस्थानी शोध घेऊन विदर्भ, मराठवाड्यातील दोन मुलींचे स्थळ आणले. आणि त्या दोघी एकाच नात्यातील आहेत अशी माहिती मुलांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. या मुली मुलांना पसंत होतात, त्यानंतर लग्नाची बोलणी होते आणि त्यानंतर लग्नही ठरते. दोन्ही मुलींच्या वडिलांना मुलाकडील मंडळींनी प्रत्येकी दीड लाख असे दोघींचे मिळून तीन लाख रुपये देण्याचे ठरले.
आणि ठरल्याप्रमाणे चिखली गावातील देवीच्या मंदिरामध्ये सोमवारी दीडच्या सुमारामध्ये हे दोन्हीही विवाह सोहळे अतिशय साध्या पद्धतीने पार पडतात. या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी मुलींकडून पाच ते सहा जण फक्त या लग्नासाठी उपस्थित असतात. लग्न व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर दोन्ही मुलींचे तीन लाख रुपये घेऊन ते नातेवाईक त्या ठिकाणावरून निघून जातात. लग्न छान प्रकारे पार पडल्यानंतर नवरदेव नवरी सह सर्वजण अतिशय आनंदाने घरी येतात. पण रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यातील एका नवऱ्याची नवरीने अंगावरील दागिन्यांसह ती फरार झाली. सकाळी जेव्हा नवरा मुलगा व त्याचे कुटुंब झोपेतून उठते. तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येतो. या नवरीच्या अशा फरार होण्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
नवरदेवाकडील कुटुंबाने लग्न करून आणलेल्या दोन मुलींच्या पैकी एक रात्रीतून पळून गेली, पण दुसऱ्या कुटुंबाने खबरदारी घेत नवरी झोपली असताना त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि त्यामुळे ती नवरी घरातच राहिली. जी नवरी पळून गेली तिने तिच्याकडील असणाऱ्या दागिन्यांसोबत पलायन केले. पण ते दागिने बेन्टेक्स चे असल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. पण पलायन केलेल्या मुलीच्या घरच्यांना जे दीड लाख रुपये दिले होते ते मात्र नुकसानात गेले. आणि ही मुलगी पळून गेल्यामुळे त्या नवरदेवाच्या कुटुंबीयांना मनस्ताप झाला.
आजकाल मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या कमी आहे आणि त्यामुळे मुलांच्या लग्नासाठी मुली मिळणे खूप अवघड झाला आहे. आणि याचाच गैरफायदा काही दलालांनी घेतला आहे. लग्नाळू नवर्या मुलांच्या कुटुंबीयांकडून पैसे घेऊन मुलींचे लग्न लावून देण्याचे व नंतर तीच नवरी फरार करण्याचे उद्योगही काहींनी चालू केले आहेत. जिल्ह्यात विशेषता श्रीगोंदा, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांमध्ये अशा भरपूर घटना घडल्या आहेत. आणि अशा घटना घडणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक देखील केले आहे. पण नगर तालुक्यातही या घटना आता वाढू लागले आहेत काही दिवसापूर्वी रुईछत्तीशी या गावांमध्ये देखील असंच घडलं होतं.
जसे की मुलीच्या लग्नामध्ये कुटुंबीयांकडून हुंडा घेणे हा गुन्हा आहे. तसेच मुलीच्या वडिलांना पैसे देऊन मुलीचे लग्न करून आणणे हा देखील एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टी करू नयेत, आणि होईल तेवढं मुला मुलींचे लग्न जमवताना अनोळखी व्यक्तींना मध्यस्थी करायला घेऊ नका. सध्या मुलींचे फसवे लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सर्वांनी खबरदारी घेऊन आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फतच लग्न जुळवावेत. आणि पुढे आपली होणारी फसवणूक टाळावी. असं मत नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे मांडले आहे.