नगर : रेखा जरे खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत, पहा बातमी सविस्तर.
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यभर गाजलेल्या रेखा जरे खुन खटल्याचा तपास जलदगतीने लावल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहे. देशभरातील 151 पोलिसांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गृहमंत्री पदक प्रदान करण्यात येणार आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बाळ बोठेसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक पाटील यांनी केला. आरोपींना अटक करून त्यांच्याविरूध्द न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याची उत्कृष्ट पध्दतीने जलदगतीने उकल केल्याबद्दल उपअधीक्षक पाटील यांना गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.
तपासाच्या बाबतीत चांगले काम करणार्या पोलिसांना दरवर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक दिले जाते. या वर्षाच्या सुरूवातीला सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर तपास यंत्रणांकडून पोलिसांची नावे मागविण्यात आली होती. 30 एप्रिलपर्यंत ज्या पोलीस कर्मचार्यांची नावे प्राप्त झाली, त्यापैकी 151 जणांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे.