दुचाकीवरून माहेरी जाताना प्रसव कळा ; महामार्गावरच महिलेची प्रसूती, गोंडस मुलीचा जन्म.

त्या चिमुकलीचा महामार्गावर झाला जन्म , तिच्या जन्माची ही अत्यंत भावनिक कहाणी आहे , महिला आपल्या पतीबरोबर दुचाकी वरून निघाली होती मात्र वाटेत तिला प्रसव वेदना सुरु झाल्या आणि मुंबई- आग्रा महामार्गावरील डिसान चौफुलीपुढे एका महिलेला प्रसव कळा झाल्या. तिच्या पतीने महामार्गाच्या कडेला दुचाकी थांबविली. त्यावेळी इतर पादचारी महिलांना ही स्थिती लक्षात आल्यावर त्यांनी पिशवीतून साड्या काढत पीडित महिलेभोवती गोलाकार कडे केले. यावेळी तिला कन्या रत्न प्राप्त झाले.
तिडीवाडी येथील मुकेश गली पावरा हा पत्नी निकिता हिला दुचाकीने माहेरी सेंधवा येथे प्रसूतीसाठी नेत होता. मात्र, माहेरी पोहचण्यापुर्वीच धुळे परिसरातील डिसान चौफुलीपुढे निकिताला अचानक प्रसव कळा सुरू झाल्या. त्यामुळे मुकेशने महामार्गाच्या कडेला दुचाकी थांबविली. ही स्थिती पादचारी तीन महिलांना लक्षात आली. त्यांनी निकिता जवळ येत त्यांच्या पिशवीतील साड्या काढून निकिताभोवती गोलकडे केले.
महामार्गावरुन ये-जा करणारे नागरीक देखील वाहन थांबवून निकिताला रूग्णालयात पाठविण्याचा प्रयत्न करत होते.
वाहनांना इशारा केला जात असतानाच गस्तीवर असलेले मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. निकम, हवालदार पी. एन. सोनवणे, व्ही. बी. शिरसाट यांना ही घटना दिसली.क्षणाचाही विलंब न करता ते थांबले आणि त्यांनी धुळे लळींग टोलनाक्यावर संपर्क केला. लागलीच रुग्णवाहिका मागविली. मात्र, त्याचवेळी निकिताला जागेवरच कन्यारत्न प्राप्त झाले. मोहाडी पोलिसांनी रुग्णवाहिकेतून निकितासह तिचं बाळ आणि मदतीसाठी त्या तीन महिलांना धुळे जिल्हा रूग्णालयात पाठविले. कर्तव्य बजावताना घटनेचे गांभीर्य ओळखून निकम, शिरसाट, सोनवणे यांनी माणुसकीचे दर्शन घडवन जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे प्रभावित होऊन नवनिर्वाचित धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुणवत्तापूर्वक कामगिरीबाबत तिघा पोलिसांना दहा हजाराचे रोख बक्षिस देत कौतुक केले. त्यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा शहराचे नवनिर्वाचित उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी तिघा पोलिसांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.