दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरांचे आयोजन; आरव्हीवाय-एडीआयपी शिबिरे.

खा. निलेश लंके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक.
अहिल्यानगर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक साधनं व उपकरणांचे मोफत वितरण शिबिरे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गटातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशांत कोरंगतीवर, तसेच दक्षिण मतदारसंघातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शिबिरांसाठी आवश्यक नियोजन, स्थळांची निवड, प्रसारमाध्यमांद्वारे माहिती, स्वयंसेवकांची नियुक्ती, वीज–पाणी व आसनव्यवस्था, वैद्यकीय सुविधा, नोंदणी प्रक्रिया, संबंधित टीमसाठी प्रवास आदी बाबींबाबत निर्णय घेण्यात आला.
खासदार लंके यांचा पाठपुरावा : खासदार नीलेश लंके यांनी यापूर्वीच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांना पत्राद्वारे मागणी करून ही योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. नगर येथे पार पडलेला बैठकीत खासदार लंके म्हणाले, “दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक यांना कृत्रिम अवयव, सहाय्यक साधनं, तसेच विविध कौशल्य विकास योजना मिळाव्यात, यासाठी मी सातत्याने केंद्र शासनाशी पाठपुरावा करत आहे. गावपातळीवर लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.”
दिव्यांगासाठी कोणती साधनं मिळणार? : दिव्यांगांसाठी ट्रायसायकल, व्हीलचेअर, मोटारीकृत बॅटरी ट्रायसायकल, श्रवणयंत्र, ब्रेल किट, स्मार्टफोन, एडीएल किट्स, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, वॉकर, काठी आदी
ज्येष्ठ नागरिकांसाठी : व्हीलचेअर (कमोडसह), श्रवणयंत्र, कमोड चेअर, वॉकर, टेट्रापॉड, एलएस बेल्ट, स्पाइनल बेल्ट, क्रचेस, सिलिकॉन कुशन आदी
पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रं : यूडीआयडी कार्ड, व दिव्यांग प्रमाणपत्र (किमान ४०% अपंगत्व), आधारकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र ( २२ हजार ५०० रुपयांपेक्षा पेक्षा कमी मासिक उत्पन्न) ब्रेल काठी व स्मार्टफोनसाठी विद्यार्थी दाखला
ज्येष्ठ नागरिकांसाठी : आधारकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र (१५ हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी मासिक उत्पन्न)
खासदार लंके यांची हमी : या शिबिरांमुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांना जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे. खासदार लंके यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश देत ही योजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.