शिक्षकांचे संसद दर्शन; लोकशाहीचा थेट अनुभव खा. निलेश लंके यांची अभिनव संकल्पना…

संसद भवन, लाल किल्ला, अक्षरधाम मंदिरास भेट; शिक्षणाच्या सेवेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान.
अहिल्यानगर : प्रतिनिधी
शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्काराची, ज्ञानाची आणि चारित्रयाची मोहोर उमटविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत २०० पेक्षा अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.

दि. १९ जुलै रोजी सकाळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकार शुभेच्छा आणि शुभेच्छुकांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक दौऱ्याला सुरूवात झाली. विशेष म्हणजे खासदार नीलेश लंके स्वतः या सर्व शिक्षकांबरोबर रेल्वेने प्रवास करत त्यांच्या सुख-सुविधांची काळजी घेत होते. दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी शिस्तबद्ध व्यवस्थापन, आत्मीय स्नेहभाव आणि जबाबदारीचे दर्शन घडविले.
दिल्लीमध्ये पोहचल्यानंतर सर्वप्रथम या निवृत्त शिक्षकांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिरातील भव्य स्थापत्यशैली, संस्कृतीचे दर्शन तसेच संध्याकाळच्या प्रकाश आणि ध्वनी शोमुळे संपूर्ण मंडळी भारावून गेली. मंदिरातील अध्यात्मिम वातावरणाने त्यांच्या मनाला स्पर्श केला.

दुसऱ्या दिवशी सर्वांनी लाल किल्ल्याच्या परिसरात इतिहासाची पावले अनुभवली. मुघलकालीन वास्तुकला, स्वातंत्र्य संग्रमाची पार्श्वभूमी आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाची झलक पाहून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षणाच्या आठवणी जागृत झाल्या. आम्ही शिकविलेला इतिहास आज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याच्या भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या.
लोकशाहीचा लाईव्ह क्लासरूम :
या दौऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय संसद भवनाला दिलेली भेट. विशेष बाब म्हणजे या दौऱ्याचा दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होता शिक्षकांनी संसदेतील प्रत्यक्ष कामकाज अनुभवले. राज्यसभेच्या शांत सभागृहातील चर्चा, लोकसभेतील आंदोलन, प्रश्नोत्तरांची सत्रे मंत्री आणि खासदारांची भाषणे या साऱ्या गोष्टी पाहून शिक्षक भावुक झाले. यावेळी शिक्षकांना विविध पक्षांचे खासदार, मंत्री आणि अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. खासदार नीलेश लंके यांनी शिक्षकांचा संसदेत औपचारिक परिचय करून दिला. त्यांचे योगदान उचलून धरले आणि शिक्षकांचा सन्मान म्हणजे भविष्याचा सन्मान अशी भावना व्यक्त केली.

आदर्श नियोजन :
या संपूर्ण दौऱ्यात निवासाची सोय, वातानुकूलीत बसद्वारे स्थळ दर्शन, दर्जेदार जेवण, वेळच्या वेळी नास्ता या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक नियोजित करण्यात आल्या. सर्व व्यवस्था खासदार लंके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. कोणत्याही वगोगटाच्या शिक्षकांना कोणताही त्रास होणार नाही याची खा. लंके व त्यांच्या टिमने दक्षता घेतली.
आमच्या कार्याला मान्यता मिळाली !
या दौऱ्यात शिक्षकांच्या चेहऱ्यावर वेगळाचा आनंद दिसून येत होता. निवृत्तीनंतर विस्मरणात गेलेल्या शिक्षकांना हा अनुभव, सन्मान, आदर आणि आत्मिक समाधान देणारा ठरला. आमचं संपूर्ण आयुष्य इतरांचे भविष्य घडविण्यात गेलं. पण आज आमचा भूतकाळा कोणीतरी लक्षात ठेवला हे फारच मनाला भिडणारं असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
