गाडीतल्या छत्रपतींच्या मूर्तीबद्दल पहा काय म्हणाले तिरुपती विश्वस्त आणि खासदार जाधव.
बरेच दिवसापासून आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी हे देवस्थान चांगले चर्चेत आले होते. आणि चर्चेत येण्याचे कारणही तसेच होते. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला होता. त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर/ मूर्ती काढायला लावली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल झाला. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थान बद्दल प्रचंड संताप व्यक्त केला गेला. पण आता तिरुपती बालाजी देवस्थानने यामध्ये माघार घेतली आहे. तसेच इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे.
आंध्र प्रदेश मधील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेश करताना यापुढे आपल्याला महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणती अडचण येणार नाही, अशी माहिती शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिली. खासदार जाधव सध्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले असून तिथल्या प्रशासनाशी चर्चा केली. व या वादावर तोडगा काढला आहे. मंदिर प्रशासनासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मीडियाशी संवाद साधत असताना जाधव म्हणाले की, ” मी मागील तीन दिवसापासून तिरुमला तिरुपती मंदिरात आहे. व्यास महाराजांचे कथा कीर्तन ऐकण्यासाठी आलो होतो. मंदिराचे मुख्य विश्वस्त धर्मा रेड्डी हे देखील उपस्थित होते. चार दिवसापूर्वी मी एक फेसबुक पोस्ट बघितली त्याबाबत देखील मी रेड्डी यांच्याशी चर्चा केली. मात्र अशी कोणतीही अडवणुकीची कृती मंदिर प्रशासनाकडून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथले नियमानुसार मंदिराच्या आवारात कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र भाविकांकडून गाड्यात लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्या गाडीत असल्यास यापुढे मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक केली जाणार नाही ” असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती गाडीत लावण्यावरून जो वाद पेटला होता, हा वाद बैठकीदरम्यान मिटला. आपण देवी देवतांच्या प्रतिकृती लावण्यावरून वाद चालू होता व बैठकीदरम्यान चर्चा झाली. देवी देवतांच्या प्रतिकृती गाडीमध्ये लावतो तसेच छत्रपती महाराजांची प्रतिकृती लावतो यावर तिरुपती तिरुमाला देवस्थानचा कोणताही आक्षेप नाही. त्यांचे म्हणणे फक्त येणाऱ्या भक्तजनांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, सुरक्षिते करिता जे काही प्रश्न विचारण्यात येतील त्यांना महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जनतेने सहकार्य करावे एवढीच अपेक्षा आहे. असं जाधव यांनी सांगितलं.