शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं; का दिली उद्धव ठाकरे गटाच्या हाती मशाल पाहा बातमी सविस्तर
शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे.शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला होता. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पूर्वी शिंदे गटानं आयोगानं चिन्हाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती.
चिन्ह म्हणून त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल हे चिन्ह आयोगाला दिलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगान उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी असं आहे.
उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवं चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची.
१९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे मशाल चिन्हावर खासदार झाले होते. शिवसेनेनं यापूर्वी ढाल तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर केला होता.