नगर शहर हादरले; नामवंत हॉटेल चालकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण करून लुटले
युवकाला कोयत्याने मारहाण करत आठ तोळे वजनाची सोन्याची चेन व 15 हजार रूपये रोख रक्कम असा ऐवज चौघांनी लुटला. सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास निलक्रांती चौकात ही घटना घडली. या प्रकरणी मंगळवारी पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी युवक सिध्दार्थ संदीप बोरूडे (वय 18 रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 26, रा. निलक्रांती चौक) व तीन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी रात्रीच टिंग्या साळवेला अटक केली आहे. सिध्दार्थ बोरूडे व त्यांच्या हॉटेलवरील वॉचमन सोमवारी रात्री दुचाकीवरून जात असताना पावणे बारा वाजेच्या सुमारास निलक्रांती चौक येथे गुन्हेगार टिंग्या साळवे याने सिध्दार्थ यांच्या गळ्यातील आठ तोळ्याची सोन्याची चेन ओढल्याने त्यांचा दुचाकीवरील तोल गेला.
ते दुचाकी सोडून पळू लागले असता त्यांना कोयत्याने पाठीवर मारून जखमी केले. तसेच टिंग्यासह इतर तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिध्दार्थ यांच्या खिशातील 15 हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हेगार टिंग्या साळवेला रात्रीतून ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे