कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभाराला संपूर्ण बांधकाम विभाग कंटाळले.
खामगांव : 26 जून 2024 रोजी दुपारी बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या मनमारी कारभाराला कंटाळून विभागीय लेखापाल शैलेंद्र कुमार यांनी मोजमाप पुस्तिका फेकून कार्यकारी अभियंता यांच्या दालनामध्ये स्वतःचा लॅपटॉप फेकल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी जेव्हापासून चार्ज घेतला आहे तेव्हापासून त्यांच्या विरोधात सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. राऊत हे आपल्या कार्यालयामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देतात तसेच कार्यालयामध्ये त्यांच्याच मर्जीप्रमाणे कामे करण्यात यावी व बुलढाणा विभागातील कुठल्याही शाखा अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता यांच्या सोबत त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामाबाबत कधीही कुठलीही चर्चा करत नाहीत. एवढेच नाही तर कार्यकारी अभियंता सुभाष राऊत हे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोन कॉल सुद्धा उचलत नसल्याची तक्रार नाव न सांगण्याच्या अटीने काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केली आहे. बांधकाम विभागामार्फत बुलढाणा कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या कुठल्याही कामावर ते कधीही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत नाहीत, कारण की ते स्वतः तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे कुठलेही मार्गदर्शन व निर्णय देऊ शकत नसल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे नेहमीच ऑफिसमध्ये कमी तर त्यांच्या मुंबईच्या वाऱ्या जास्त सुरू असल्याचे दिसून येते. अनेक वेळा शासकीय ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांना ते भेटत सुद्धा नाहीत. 26 जुन रोजी कार्यकारी अभियंता सुभाष राऊत हे आपल्या दालनात बसलेले असताना विभागीय लेखापाल शैलेंद्र कुमारयांचा संयम सुटल्याने हे ठेकेदारांचे परस्पर बिले का काढल्या जातात यासंदर्भात सुभाष राऊत यांना भेटायला गेले असता विभागीय लेखापाल यांच्या कुठल्याही सह्या बिलांवर न घेता बिले कशी काढली जातात याबाबत जाब विचारला असता त्यांना सुद्धा राऊत यांनी उडवाउडुचे उत्तरे दिले. कार्यकारी अभियंता हे विभागीय लेखापालांना विश्वासात न घेता नेहमीच परस्पर आपल्या दालनामध्ये बसून ठेकेदारांकडून चांगली मलिदा मिळाल्यानंतरच परस्पर देयके काढतात व ज्यावेळेस ठेकेदार त्यांच्या दालनात बसलेला असतो त्यावेळेस कुठलाही अधिकारी कर्मचारी व कुठलेही विजिटर्स यांना दालनामध्ये येण्याची परवानगी नाकारली जाते, याच कारणावरून चिडून जाऊन विभागीय लेखापाल शैलेंद्र कुमार यांनी कार्यालयातील सर्व मोजमाप पुस्तिका व ऑफिसचा लॅपटॉप त्यांनी रागाच्या भरात फेकून दिला व आपल्या केबिनला लॉक लावून कुठल्यातरी अज्ञात स्थळी निघून गेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितली आहे.
मात्र विभागीय लेखापाल शैलेंद्र कुमार हे सायंकाळी वापस येऊन आपल्या केबिनचे लॉक उघडून घेतले होते असे तिथे असणारे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होत असलेल्या कामांमध्ये नेहमीच अनियमितता काम न करता दरवेळी दिसून येते. त्यामुळे ठेकेदारांकडून मलीदा घेऊन तसेच काही ठिकाणी ठेकेदारांकडून काम पूर्ण झालेले नसते मात्र त्या ठेकेदारांना हाताशी धरुन अपुर्ण कामाचे देयके स्वतः केबिनमध्ये बसून अर्थपूर्ण सहाय्य त्यांच्याजवळ जमा झाल्यानंतर परस्पर देयके काढून देतात. नियमानुसार कुठल्याही शासकीय कंत्राटदाराचे देयके काढण्याकरता पहिले शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात सादर करावी लागतात व त्यांच्या संपूर्ण कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतरच कार्यकारी अभियंता यांच्याकडे फायनल करण्यासाठी जात असते, मात्र तसे न करता परस्पर देयके स्वतः कार्यकारी अभियंता सुभाष राऊत हे पास करतात.
त्यानंतर त्या काढलेल्या देयकावरती अधिकारी व कर्मचारी यांनी काही आक्षेप घेतला तर त्यांना या ना त्या कारणाने त्रास देणे सुरू करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या कार्यक्षेत्रामध्ये झालेल्या अनियमतेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे फार गरजेचे आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अनियमतेची चौकशी जर झाली तर फार मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांच्या या झालेल्या कामाची अनियमतेची चौकशी होने सुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या या संपूर्ण वागणुकीमुळे बुलढाणा कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शासकीय ठेकेदार यांच्यामध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ याचे गांभीर्य समजून कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांची तात्काळ बदली करावी अशी चर्चा बुलढाणा शहरात नागरिक दबक्या आवाजात करताना दिसून येत आहेत. गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळल्याने शेवटी विभागीय लेखापाल शैलेंद्र कुमार यांचा संयम तुटल्याचे दिसून आले आहे. आज झालेल्या या सर्व प्रकारामुळे आता वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या विरोधात काय निर्णय घेतात हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.