थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर उजळला, पण मंत्री महोदयांचा राहाता अंधारातच – प्रभावती घोगरे

राहाता, दि. २१ ऑक्टोबर :
दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि ऐक्याचा सण, पण यंदा संगमनेर आणि राहाता तालुक्यांतील वास्तवात मोठी तफावत दिसून आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी या विरोधाभासावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे.
सौ. घोगरे म्हणाल्या, “आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांनी दिवाळीपूर्वी सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ₹१०२ कोटींचा लाभ दिला. राजहंस दूध संघ, साखर कारखाना, पतसंस्था, शेतकी संघ आणि अमृत उद्योग समूहाने एकत्र येऊन जनतेच्या हातात समृद्धीचा दिवा पेटवला. हेच थोरात साहेबांच्या सहकार आणि जनसेवेचे खरे यश आहे.”
पण राहाता तालुक्यात मात्र काळोखी दिवाळी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात कामगारांना वेळेवर पगार नाही, पाहिजे असा बोनस नाही, उसाच्या पेमेंटचा दुसरा हप्ता थांबलेला आहे. प्रवरा दूध संघ मोडीत निघाला, शेतकरी अडचणीत आहेत, आणि कामगार वर्ग निराश आहे. सत्ताधारी फक्त जाहिराती करतात, पण जनतेच्या हाती अंधारच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
त्या पुढे त्यांनी सांगितले, “संगमनेर तालुका सहकार, शिक्षण आणि शेतीच्या बळावर प्रगतीच्या शिखरावर आहे, तर राहाता तालुक्यात सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आजही कर्जबाजारी आणि हतबल आहेत. दिवाळीत दिवे पेटवले पाहिजेत, पण इथे अंधार वाढतो आहे. जनतेने आता ही लाचारी सोडून लढ्याची ज्योत पेटवली पाहिजे.”
सौ. प्रभावती घोगरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या अधोरेखित करत त्यांनी पुन्हा एकदा आपली संघर्षशील भूमिका ठळकपणे मांडली आहे.