वनकुटेकरांनी आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही; सत्काराला उत्तर देताना पोलिस उपायुक्त गणेश इंगळे भावूक.

पारनेर : प्रतिनिधी
पुणे विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांचे गावात सनई-चौघड्डयांच्या मंगल सुरात, फुलांच्या उधळणीत फटाक्यांच्या आताषबाजीत आणि वर्ग मित्र मैत्रिणींनी केलेल्या प्रेमळ सजवटीत जल्लोषात स्वागत करण्यात येऊन त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. वनकुटेकरांनी आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही असे संगत सत्काराला उत्तर देताना इंगळे हे भाऊक झाले.
मिरवणुकीने गावाच्या गल्लीबोळांतून फिरताना इंगळे हे भूतकाळात रमून गेले. मी ज्या गल्ल्यांत खेळलो, शाळेत घडलो, त्या मायभूमीत आज माझा सन्मान होतोय. हे भारतरत्न मिळाल्यासारखं आहे, त्यांनी कंठ दाटून आलेल्या स्वरात सांगितलं.
आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर नातेवाईकांनी, गावकऱ्यांनी व शिक्षकांनी दिलेल्या आधाराची आठवण इंगळे विसरले नाहीत. आई वडिलांची गावकरी, नातेवाईकांनी उणीव भासू दिली नाही असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. सातवीतून बाहेर पडलो, त्यावेळी शिक्षकांनी, नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी पुढील शिक्षणासाठी वस्तूरूप व आर्थिक मदत दिली. गुरूंनी दिलेल्या संस्कारांमुळेच मी आज या पदावर उभा आहे. माझ्या गुरूंचा, माझ्या गावाचा आणि नातेवाईकांचा मी आयुष्यभर ॠणी आहे, असे ते म्हणाले.
गावातील तरूणांना मार्गदर्शन करताना इंगळे यांनी ठाम शब्दात सांगितले की, स्वप्न मोठं ठेवा, चिकाटी ठेवा, अपयशाचं भय बाळगू नका. नापास झालेले विद्यार्थी आज जिल्हाधिकारी, सचिव झाले आहेत. दहा जागांसाठी लाखो अर्ज असले तरी तुम्हाला एक जागा हवी आहे, असा आत्मविश्वास निर्माण करा. आत्मचिंतन करा, शरीर तंदुरूस्त ठेवा, तुमची अंतःशक्ती जागी झाली तर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही.
आपल्या कार्यक्षेत्राशी निगडित संदेश देताना इंगळे स्पष्टपणे म्हणाले, शत्रूराष्ट्र तरूणांना व्यसनांच्या विळख्यात अडकवत आहेत. महाराष्ट्रात या विरोधात स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करण्यात आला असून आणि माझीच नेमणूक तिथे झाली आहे. मला स्वतःला कसले व्यसन नाही, म्हणून अधिकारवाणीने सांगतो की गावातील कोणीही या वाटेवर जाउ नये. अन्यथा मला कठोर कारवाई करावी लागेल. पण मला हवंय की माझं गाव या विळख्यात कधीही अडकू नये. राजू डहाळे व योगेश मुसळे यांनी सुत्रसंचलन केले.