सुप्याच्या एमआयडीसीत येणार श्रीलंकेचा मुथय्या; १ हजार ६३५ कोटींची करणार गुंतवणूक…
पारनेर : प्रतिनिधी,
देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंका क्रिकेट टीमचा यशस्वी फरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली असून या औद्योगिक वसाहतीमधील सर्वाधिक गुंतवणूक असलेला प्रकल्प मुथय्या हा उभारणार आहे.
येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहीती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी १ हजार ६३५ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या कंपनीमध्ये विविध शितपेयांसाठी लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधून निवृत्ती घेतल्यानंतर मुथय्या मुरलीधरन याने सिलोन बेव्हरेजेस या उद्योग समुहाची उभारणी केली असून विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्पांबरोबरच मुथय्या याने त्याच्या उद्योगाचा विस्तार वाढवत आला थेट सुप्याच्या एमआयडीसीमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगासाठी ३५ एकर जमीनीची मागणी करण्यात आली असून त्यातून ४५५ तरूणांना रोजगाराची निर्मिती होणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडे मुथय्या मुरलीधरन याच्या कंपनीकडून जागेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मायनर मॉडीफीकेशन कमिटीच्या बैठकीत भुखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाच्या बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी डी.आर. काकडे यांनी सांगितले.