बेलकर बंधू लंके यांच्यासोबतच ! विरोधकांची खोडसाळपणातून बातमी प्रसिध्द केल्याचा खुलासा, विखे हतबल झाल्याची टीका..
पारनेर : प्रतिनिधी,
सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये काळेवाडीचे गंगाराम बेलकर व शिवाजी बेलकर हे आ. नीलेश लंके यांच्यासोबतच असून विरोधकांनी आमच्या खदखदीचा फायदा घेत हे वृत्त प्रसारीत करून विपर्यास केल्याचा खुलासा गंगाराम बेलकर व शिवाजी बेलकर यांनी केला आहे. दरम्यान, पराभव दिसू लागल्याने हतबल मानसिकतेतून विखे यांच्याकडून असे प्रकार सुरू झाल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
शिवाजी बेलकर म्हणाले, सोशल मीडियावर जे वृत्त प्रसारीत झाले आहे ते खोडसाळपाणातून देण्यात आले आहे. गंगाराम बेलकर यांची थोडीफार नाराजी होती, परंतू त्याबाबत आ. नीलेश लंके यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची नाराजी दुर झाली आहे. संपूर्ण टाकळी ढोकेश्वर गटामध्ये लंके यांच्या मताधिक्क्यासाठी आम्ही दोघे बंधू परीश्रम घेणार आहोत. लंके यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या मताधिक्क्यात वाढ करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असे शिवाजी बेलकर म्हणाले.
गंगाराम बेलकर म्हणाले, तरूण मंडळ तसेच ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र बसून नीलेश लंके यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात काही गोष्टी जाणवल्याने थोडी नाराजी होती ती लंके यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुर झाली आहे. बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा विषय होता, त्यातून खदखद होती.
मात्र चर्चेनंंतर ती दुर झाली आहे. एक पाय इकडे व दुसरा तिकडे असे राजकारण आम्ही करत नाही आम्ही नीलेश लंके यांच्यासोबत होतो व यापुढेही राहणार आहोत. आमच्या मनातील खदखद ओळखून तशा प्रकारचे वृत्त खोडसाळपणातून देण्यात आले आहे. मात्र तरूण मंडळे तसेच ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आमच्या खदखदीचा विपर्यास करणे अत्यंत चुकीचे होते. आमदार नीलेश लंके यांचा यात दोष नसल्याचे गंगाराम बेलकर म्हणाले. विपर्यास असलेले वृत्त आल्यानंतर प्रकाश गाजरे व शिवाजी भोसले यांनी पुढाकार घेत या प्रकरणावर पडदा पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली.