नय्यर विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात; खेळात करिअरच्या मोठ्या संधी – जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले.
नगर – संचलनातील खेळाडूंच्या ग्रुपला खेळाडूंची नावे देऊन विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. जीवनात पुढे जाताना खेळाडूंनी चांगला खेळ करून शाळेचे, देशाचे, गावाचे, शिक्षकांचे व आई-वडिलांचे नाव मोठे करा. पूर्वीच्या व आताच्या परिस्थितीत फार मोठा बदल झाला असून, खेळांचे विविध प्रकार आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. खेळात करिअर करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी नोकरीमध्ये काही जागा राखीव ठेवल्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान बिशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2022-23चे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. पी. मुजावर, संस्थेचे सचिव बापूसाहेब आंधळे, खजिनदार बी. एन. गोरे, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंदा हांडे, लिपाणे सर, क्रीडा शिक्षक संतोष नागरगोजे, एकनाथ मोटे, आदिनाथ घुगरकर, अजय जाधव आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. पी. मुजावर म्हणाले की, खेळाचे अनेक फायदे असून, तुमचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी करण्याचे काम यामुळे शक्य होते. खेळामुळे शरीर सुदृढ बनते. मन प्रसन्न राहते. अनेक खेळाडूंनी गरीबीवर मात करीत प्रचंड मेहनतीच्या बळावर विविध खेळांत यश मिळविल्याचे पहावयास मिळते. मैदानावर खेळ खेळा व शरीर कमवा, असे ते म्हणाले.
सचिव बापूसाहेब आंधळे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या तरी खेळात सहभागी व्हावे, यासाठी संस्था प्रयत्नशील असते. अभ्यासाबरोबर मुलांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. वार्षिक क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांत उत्साह असल्याचे ते म्हणाले.