गुन्हेगारी

मोठी बातमी : अखेर लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्या विखेच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल…

लंके यांच्या रॅलीत सहभागी झाल्याचा राग; सोन्याची चेन आणि पैसेही लांबविले, पोलीसांकडून फिर्यादीची प्रत देण्यास टाळाटाळ…

पाथर्डी : प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्याच्या रागातून खा. डॉ. सुजय विखे यांचा बॉडीगार्ड गौरव सुधाकर गर्जे याने सहकाऱ्यांच्या मदतीने शहादेव भानुदास पालवे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, दि. ५ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास राजी नव्हते. फिर्यादी शहादेव यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शहादेव यांचा पोलीसांनी जबाब नोंदविला. जबाब नोंदविल्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता. शहादेव यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली.

यासंदर्भात शहादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की, दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहादेव हे चिचोंडी येथून नीलेश लंके यांची रॅली संपल्यानंतर दुचाकीवरून शिराळ मार्गे मजले चिंचोली येथे जात असताना शिराळ शिवारातील हॉटेल शिवतेज येथे पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन ते पुढे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून गौरव सुधाकर गर्जे तसेच ओमीनी गाडीतून रामेश्‍वर प्रकाश पालवे, ज्ञानेश्‍वर प्रकाश पालवे, सर्व रा. कोल्हार कोल्हुबाईचे ता. पाथर्डी तसेच इतर दोन अज्ञात इसम हे शहादेव यांच्याजवळ आले.

गौरव गर्जे याने शहादेव यांच्या दुचाकीस त्याची दुचाकी आडवी लावून ओमीनीमधील इसमांनी जवळ येत गौरव गर्जे याने शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तु नीलेश लंके याच्या रॅलीत का फिरतोस ? मी विखेचा बॉडीगार्ड आहे हे माहीती नाही का ? असे विचारत हातातीलन गजाने डाव्या बाजूच्या बरगडीवर मारहाण केली. गळयातील एक तोळयाची चेन ओरबडली. त्याच वेळी रामेश्‍वर प्रकाश पालवे याने डोक्यात दगड मारला आणि खिशातील १७ हजार ७५० रूपयांची रोकड काढून घेतली. इतर दोन अनोळखी इसमांनी पोटात लाथा बुक्क्यांनी, रॉडने मारहाण करीत गौरव गर्जे याने तुला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर शिविगाळ करत सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.

मारहाणीनंतर जखमी शहादेव यांनी चिचोंडी येथे जाऊन प्राथमिक उपचार घेऊन नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शहादेव यांच्या फिर्यादीनंतर सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!