सी.एस.आर. योजने अंतर्गत भारतीय स्टेट बँकचे ” सावली ” प्रकल्पाला संगणक, टेबल व सौरदिवे भेट.
अहमदनगर (प्रतिनिधी)- आई-वडिल नसलेले, एकल पालक व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा सांभाळ करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या संकल्प प्रतिष्ठानच्या केडगाव येथील सावली प्रकल्पास भारतीय स्टेट बँकच्या (क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय अहमदनगर) व्यावसायिक सामाजिक दायित्व योजने अंतर्गत संगणक टेबल, व्हील चेअर आणि सौर दिव्यासाठी दोन लाख रुपयाची भरीव मदत देण्यात आली.
भारतीय स्टेट बँक नेहमीच व्यावसायिक दृष्टीकोनाबरोबर सामाजिक दायित्वाच्या भावनेने समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात पुढे करत असते. या भावनेने बँकेच्या वतीने सावली प्रकल्पाला मदतीचा हात देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची मदत देवून सौर दिव्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय स्टेट बँकचे प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यनारायण पांडे, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर खैरकर, उपप्रबंधक कुटे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहळ, तुषार कवडे, रोहिणी कोळपकर उपस्थित होत्या.
सूर्यनारायण पांडे यांनी समाजातील वंचित मुलांना सावली देवून त्यांना प्रवाहात आणण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. मुलांचा आत्मविश्वास पाहून व संस्थेच्या कार्याने मदत योग्य ठिकाणी केल्याचे समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जयंत ओहळ यांनी भारतीय स्टेट बँक कडून मिळालेली मदत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी फायद्याची ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी सावलीचे संस्थापक नितेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पसायदान करुन सर्वांचे स्वागत केले. तर बनसोडे यांनी सावलीचा स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. व्यवस्थापक अजिंक्य आंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.