पारनेर ते खर्डा प्रवासासाठी तब्बल ९ तास; तुळजापुर दर्शनासाठी जाताना आ. लंके यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत..
कार्यकर्त्यांसमावेत तुळजापुरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या आ. नीलेश लंके यांचा ताफा जिल्हयाच्या सिमेवर खर्डा येथे पोहचण्यास तब्बल ९ तासांचा अवधी लागला ! हंगे येथून निघालेल्या आ. लंके यांच्या वाहनांच्या ताफ्याचे नगर दक्षिणच्या विविध गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच भाजपा, शिवसेना उध्दव ठाकरे व शिंदे गट, काँग्रेस अशा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लंके यांनी जंगी स्वागत केले.
ढोल, ताशे, तुताऱ्यांचा निनाद तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत आ. लंके व त्यांच्या समर्थकांचे गावागावांमध्ये स्वागत करण्यात येत होते. आ. लंके यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या मी अनुभवलेला कोव्हीड या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन करण्यात आले. आ. लंके यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी विविध गावांमधील सर्वसामान्य नागरीक आ. लंके यांची भेट घेऊन करत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
हंगा या आ. नीलेश लंके यांच्या गावातून लंके हे रॅलीने तुळजापुरकडे निघाले असता कामरगांव, रूईछत्तीसी, मिरजगांव, माहिजळगांव, जामखडे, खर्डा या प्रमुख गावांमध्ये आ. लंके यांच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
रूईछत्तीसी येथे रॅली पोहचल्यानंतर तिथे लावण्यात आलेल्या बॅनरने सगळयांचे लक्ष वेधून घेतले. शरद पवार, नीलेश लंके, राणीताई लंके, राहुल जगताप यांचे एकत्रीत फोटो तसेच तुतारी चिन्ह या बॅनरवर होते. आणि बॅनरचा मथळा होता वस्तादाचा पहिला डाव !