पांडव ज्या गावातून गेले ते गाव माहित आहे का ? चक्क देशांचे पंतप्रधान या गावाला भेट देणार आहे.
सध्या भारतातलं शेवटचं गाव खूप चर्चेत आहे. कारण त्या गावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. या गावाचं नाव माणा असून, या गावाला अधिकृतपणे भारतातलं शेवटचं गाव असल्याचा दर्जा मिळालाय. हे गाव उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असून या गावापासून चीनची सीमा 24 किलोमीटर दूर आहे. माणापासून चार धामपैकी एक बद्रीनाथ 3 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून या गावाची उंची 3,219 मीटर आहे. या गावात (मंगोल आदिवासी) समुदायाचे लोक जास्त संख्येने राहतात. माणा हे गाव सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे तसेच हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. इथलं वातावरण अतिशय स्वच्छ आहे. 2019 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात माणा गावाला ‘स्वच्छ गाव’चा दर्जा मिळाला होता.
माणा गावातूनच पांडवांनी स्वर्गाच्या दिशेची वाटचाल सुरू केली होती, असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार, पांडव स्वर्गाकडे याच गावातून गेले होते. पांडव स्वर्गात जात असताना द्रौपदीही त्यांच्यासोबत होती. पांडवांना शरीरासह स्वर्गात जायचं होतं आणि या प्रवासात त्यांच्यासोबत एक कुत्राही होता; मात्र जाताना एकेक जण कमी होत गेले. सर्वांत आधी द्रौपदीचा मृत्यू झाला. नंतर सहदेव, नकुल, अर्जुन व भीम यांचा मृत्यू झाला. फक्त युधिष्ठिर एकमेव बचावले आणि ते शरीरासह स्वर्गात पोहोचले. युधिष्ठिरांबरोबर असलेला श्वान यमराज होता, असं म्हटलं जातं.
गावात ‘भीम पूल’ असून तो भीमाने तयार केल्याचं म्हटलं जातं. हा पूल म्हणजे सरस्वती नदीवर असलेला एक मोठा दगड आहे. भीम पूल माणा गावातलं पर्यटन स्थळ आहे. पौराणिक कथांनुसार, पांडव माणा गावातून स्वर्गात जाताना द्रौपदीला सरस्वती नदी पार करण्यास अडचण येत होती. त्यामुळे भीमाने एक मोठा दगड उचलून नदीवर ठेवला. तो दगड अशा पद्धतीने ठेवण्यात आलाय की तो पूल बनला. यानंतर द्रौपदीने या पुलावरून नदी ओलांडली होती. महर्षी वेदव्यासांनी सांगितलेलं महाभारत भगवान गणेशांनी जिथे लिहून घेतलं, ते ठिकाण म्हणजे भीम पूल आहे, अशीही एक आख्यायिका आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, या गावाची लोकसंख्या 1214 आहे. हिवाळ्यात तिथे मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो. त्यामुळे नागरिक इतर भागांत वास्तव्यास जातात. या गावात एक तप्त कुंड असून, ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या कुंडात अग्निदेवाचा वास असल्याचं म्हटलं जातं. कुंडातल्या पाण्यात औषधी गुण असून त्यात आंघोळ केल्यास त्वचारोग दूर होतात. याशिवाय इथे गणेश गुफा, व्यास गुफा, भीम पूल, सरस्वती मंदिर अशी पर्यटनस्थळं आहेत. बद्रिनाथपासून 9 किलोमीटर अंतरावर वसुधारा धबधबा आहे. पांडव इथे काही काळ राहिले होते, असं म्हटलं जातं.