लोकांच्या दारात रोज पेपर टाकणारा बापच्या, मुली झाल्या डॉक्टर, वकील!
बापचं आणि लेकीच हे नातं सर्वांनाच माहिती आहे , यातल्या प्रेमाला जगात तोड नाही, मात्र कुटुंबामध्ये लेक जर एक असेल तर तिचा अत्यंत लाड होतो मात्र हीच संख्या जास्त असेल तर कधी कधी त्या मुलींचा राग राग होतो, मुलगी ही परक्याचं धन असतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं त्यामुळे मुलींना कितीही शिकवलं काहीही केलं तरी त्या एके दिवशी त्या लोकांच्याच घरी जाणार हे समाजमान्य टोमणे बऱ्याचदा दिले जातात. मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या मुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या बापाची ही कहाणी आज प्रेरणादायी ठरते.
नेवासा तालुक्यातील भानस हिवरे या ठिकाणी राहणारे अशोक पेहेरकर यांना तीन मुली एक मुलगा आहे, मुलगी होणं हे कमी समजलं जातं मुली झाल्या म्हणून समाजात कमी लेखलं जातं असा अनुभव सुरुवातीला अशोक यांना येत होता, मात्र याच मुलींना आपण समाजाचा आदर्श बनवण्याचा असा मानस त्यांनी आखला होता. आणि त्यासाठी अशोक पेहेरकर आणि रंजना पेहेरकर यांनी अहोरात्र कष्ट केले, हातावरच पोट, दहा बाय दहाच्या दोन खोल्या , पाचवीला पुजलेली अठरा विश्व दारिद्र्य जास्त कमी पाहुणा आला तर त्याला दारात झोपाव लागेल अशी परिस्थिती, अशोक यांच्या आईचे लवकरच निधन झालं त्यामुळे अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे लवकर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली,
आर्थिक परिस्थिती ही त्यांची बेताची तरी ही या परिस्थितीत सुद्धा न डगमगता आपल्या मुलींना उच्चशिक्षित करायचं आणि त्यांना समाजात एक मोठा मान मिळवून देण्याचा संकल्प या बापाने केला होता, आणि त्यासाठी त्यांनी आपल्या तीनही मुलींना उच्च देण्याचा निर्णय घेतला, यामध्ये आर्थिक अनेक अडीअडचणी आल्या यामध्ये त्यांना दानशूर लोकांची मदतही मिळाली,
मुली ही अभ्यासात अत्यंत हुशार होत्या नेहमी त्यांचा पहिला नंबर येत असे , त्यामुळे त्या अभ्यासाच्या जोरावर दोन मुली डॉक्टर झाल्या एक मुली वकीलीच शिक्षण घेत आहे.डॉ. श्रुती पेहेरकर हिने BHMS पूर्ण करून एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून नोकरी करते.तर जान्हवी ही BHMS शेवटच्या वर्षाला शिकत प्रॅक्टिस करते.तर छोटी अस्मिता ही एलएलबी करत आहे.तर मुलगा श्लोक हा देखील मोठा होऊन कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतो
अशोक बहिरकर त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना भरभरून बोलतात एका छपरामध्ये त्यांचा संसार सुरू झाला तो अजूनही संघर्षाच्या अनेक झळा सोसत फुलला ,अशोक बहिरकर हे पेपर टाकण्याचे काम करतात त्यामधून जास्त पैसे येत नाहीत त्यानंतर मिळेल ते काम करतात जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या गरजा ते भागवू शकतात त्यांच्या जोडीने पत्नी देखील त्यांना हातभार लावते आज ही पत्नी मोल मजुरी करत २५०,३००रुपये रोजाने कामाला जातात.
मात्र आता मुली शिकल्या हळू हळू परिस्थिती बदलेल , जी गरिबी या दांपत्यानी भोगली ती पुढे आपल्याला मुलांच्या नशिबी नको म्हणून त्यांना पूर्ण शिक्षण देणारा हा बाप समाजासाठी मोठा आदर्श आहे.