गडाख हॉस्पिटलच्या बेडवर; तरीही राहावं लागतंय न्यायालयासमोर हजर पहा बातमी सविस्तर.
नेवासा (प्रतिनिधी) – तालुका दूध संघासाठी वीज चोरी केल्याच्या कथित आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत गडाख यांनी पोलीस व न्यायालयासमोर हजर राहण्याची सक्त लेखी सुचना सोनई पोलीसांनी बजावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राजकीय अतिरेकातून आजारपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून रुग्ण शय्येला खिळलेल्या गडाख यांचा कायदेशीर छळ करण्याचे कट कारस्थान रचले गेले तर नाही? अशी आशंका त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केली जाऊ लागली आहे.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे सख्खे भाऊ असलेले प्रशांत गडाख नेवासा तालुका दूध संघाचे संचालक आहेत. आमदार गडाख यांनी राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासून भक्कम पाठराखण केली आहे. ते स्वतः अपक्ष आमदार असल्याने मध्यंतरीच्या सत्ताबदलाच्या खेळात त्यांना तांत्रिकदृष्ट्या सोयिस्कर असतानाही शिंदे गटाशी जुळवून घेत परत मंत्रीपद मिळविणे सहज शक्य होते. त्यांच्या भुमिकेकडे राज्य पातळीवरील राजकीय धुरिणांचे बारीक लक्षही होते. मात्र अवघ्या चार-सहा दिवसांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. आमदार गडाख यांची राजकीय भुमिका जाहीर झाल्याला रात्र आडवी जात नाही तोच मुंबईतील पथकाने आकस्मितरित्या सोनई पोलीस ठाणे गाठून त्यांचे बंधू संचालक असलेल्या तालुका दूध संघावर वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामागील घटनाक्रम पाहता दूध संघ, वीज चोरी हे फक्त एक माध्यम असून त्याच्या आडून आमदार गडाख यांचे गेल्या दोन वर्षांपासून आजारी अवस्थेतील बंधूचा कायदेशीर छळ करुन त्यांना जेरीस आणून त्यांची सद्यस्थितील राजकीय भुमिका बदलण्यास भाग पाडण्याचे कारस्थान शिजत असल्याचा संशय जाणकार व्यक्त करत आहेत.
ज्या कालवधीतील वीज चोरीचा दाखला देऊन गुन्हा दाखल करण्यात आला ते प्रकरण आठ ते दहा वर्षे जुने असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या फिर्यादीतच नमूद केलेले आहे. 2008 ते 2014 या कालावधीत जर वीज चोरी पकडण्यात आली होती तर त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास संबंधितांनी इतका विलंब का लावला? हाच मुळी कळीचा मुद्दा ठरत आहे. वीज चोरी पकडली होती तर तिचा पंचनामा आदी सोपस्काराची कागदपत्रे कुठे आहेत? वीज चोरी संदर्भात दूध संघाच्या सर्वसंबंधितांना यापूर्वी किती नोटीसा बजावल्या? भारतीय विद्युत कायद्यान्वये वीज चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा जास्त मागे जाता येत नसताना तब्बल आठ-दहा वर्षे मागे जाऊन गुन्हा दाखल केलाच कसा? याच कायद्यान्वये वीज आकाराच्या दीड पटीपेक्षा जास्त दंड वसूल करता येत नसताना या प्रकरणी दुप्पटीपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारला गेलाच कसा? गेल्या दोन वर्षांपासून रुग्णशय्येवर खिळलेल्या गडाख यांना पोलीस ठाणे तसेच न्यायालयासमोर हजर राहण्याच्या नोटीसा बजावण्यामागे कोणाचा हात आहे? असे विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
गडाख कुटुंब हे मोठे राजकीय वलय लाभलेले कुटुंब असले तरी त्यांनाही त्यांचे खाजगी जीवन आहे, त्यांनाही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्र भावनिक बांधिलकी आहे, याकडे राजकीय सूडाने पेटलेल्या विरोधकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. सूनेच्या आकस्मित मृत्यूमुळे आधीच मोठा आघा झालेल्या गडाख कुटुंबाला प्रशांत गडाख यांना कोरोना लागण झाल्यापासून ते रुग्णशय्येवर खिळलेल्या सध्याच्या अवस्थेबद्दल मनात मोठे दुःख असतानाही ते बाजूला सारुन लोकसेवेसाठी त्यांची धडपड सुरुच असताना केवळ त्यांना राजकीय दृष्ट्या जेरीस आणण्यासाठी अगोदर मंत्री गडाख व त्यांच्या पत्नीवर सख्ख्या भावजयीचा घातपात केल्याचा आरोप करुन त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यात आले. त्यानंतरही त्यांची राजकीय भुमिका बदलत नसल्याचे पाहून सत्तेची ताकद वापरुन रुग्णशय्येवरील त्यांच्या बंधूस कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यात आल्याने आमदार गडाख हे संकट कशा पद्धतीने हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.