वकिल संरक्षण कायद्याची मागणी करणार आ. निलेश लंके यांची ग्वाही.
वकिल संरक्षण कायदा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आमदार या नात्याने साकडे घालणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
राहुरी येथील वकिल दाम्पत्याची हत्या झाल्यानंतर राज्यभर वकिलांचे धरणे आंदोलन सुरू असून येत्या ३ फेब्रुवारीपर्यंत वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. बुधवारी सकाळी आ. लंके यांनी नगर येथील जिल्हा न्यायालयात धरणे आंदोलन करणाऱ्या वकिलांची भेट घेऊन आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर राहुरी येथेही आ. लंके यांनी भेट देत वकिल दाम्पत्याच्या हत्येचा निषेध केला.
वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे. वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकिल संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा कायदा लागू करण्याची आग्रही मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.