संतापजनक : बैलांची मिरवणूक काढली म्हणून दलितांना मारहाण; तसेच दलितांना…., पहा बातमी सविस्तर.
पुरोगामीचा डंका पिटणाऱ्या या महाराष्ट्रात नेमकं घडतंय तरी काय एकीकडे केंद्र सरकार घराघरात तिरंगा झेंडा लावण्याचा नारा देतो आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत मात्र इथल्या दलित समाजाला अजूनही जगण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही असंच पाहायला मिळते कारण की धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे पोळा सण साजरा करताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी दलित तरुणांनी काढलेली बैलांची मिरवणूक अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तसेच गावातील संपूर्ण दलित वस्तीवर बहिष्कार टाकला आहे. शिवाय यामध्ये गांभीर्याचे म्हणजे पोलिसांनीही दलित समाजाच्या तरुणांवर नाहक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप गावातील दलित कुटुंबाने लावला. संविधानाने प्रत्येकाला आपल्यावरील जो अन्याय आहे त्याला वाचा फोडत सर्वांना सारखा न्याय मिळण्यासाठी कायदे तयार केले आहेत. याच कायद्याचा आधार घेत सर्व जाती धर्मातील लोक हे आपल्यासाठी काय वाईट काय चांगलं त्या अनुषंगाने जगू पाहत आहेत.
या प्रकरणात देखील जिल्हा प्रशासनाकडे आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लेखी निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘मेहेरगाव येथे बैल पोळ्यानिमित्त दलित तरुणांनी काढलेली मिरवणूक काही जातीयवादी लोकांनी अडविली. तसेच जबर मारहाण करत लाठीकाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. परंतु, अद्याप एकालाही अटक केलेली नाही. सवर्ण समाजाने गावात बैठक घेवून व पोलिस प्रशासनावर दबाव टाकून बौध्द समाजाच्या तरुणांवर ३९५ सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला.’
या दलित कुटुंबीयांचा त्रास इतक्यावरतीच थांबला नाही तर त्यांना नको तितका त्रास देण्यात आला. यात गावातील जातीयवादी लोकांनी गावातील सर्वच दलित वसतीवर बहिष्कार टाकला आहे. दलितांना किराणा देऊ नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, न्हाव्याने दलित लोकांची दाढी, कटींग करु नये, जो दुकानदार किराणा देईल त्याला गावात बोलावून चौकात ठोकायचे आणि त्याच्याकडून एक ते पन्नास हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय गावातील सवर्ण लोकांनी घेतला आहे.
या सगळ्यांमध्ये कायदा काय सांगतोय न्यायालयीन भूमिका काय असेल हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. मात्र अशा घटनांमुळे समाजात जातीय तेच पेव पुन्हा एकदा फुटायला एक पोषक वातावरण तयार होऊ शकतं, सर्वांनी एकमेकांसोबत माणुसकीने वागणं आणि एकमेकांना सहकार्य करणं आणि आपापल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणं हे फार महत्त्वाचा आहे.