अभिमानास्पद : वडील म्हणायचे माझा मुलगा मोठा अधिकारी होईल…;
Success Story : यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू होऊन देशसेवा करावी, असं अनेक युवकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक तरुण-तरुणी त्या त्या पद्धतीने कठोर परिश्रम देखील करतात, दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. काही तरुण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील अडचणींवर मात करून या परीक्षांमध्ये यशस्वी होतात. हे तरुण समाजासाठी, अन्य तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. आयएएस विशाल कुमार हा तरुण त्यापैकीच एक होय. विशाल कुमार यांची कहाणी सामान्य तरुणांसाठी, तसंच सर्वच समाजासाठी प्रेरणा देणारी आहे. एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला एक युवक देशातल्या सर्वांत कठीण परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि एका रात्रीत चर्चेत येतो, हे खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे.
आपण पाहतो कि, दर वर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. त्यापैकी फार थोडे तरुण या परीक्षेत यशस्वी होतात; मात्र त्यापैकी काही युवकांचा हे यश मिळवण्यासाठीचा संघर्ष प्रेरणादायी असतो. आयएएस विशाल कुमार यांची कहाणी सुद्धा अशीच आहे. बिहारमधल्या (Bihar) मुझफ्फरपूर जिल्ह्यातले रहिवासी असलेले विशाल कुमार 2021 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 484 वी रॅंक मिळवून यशस्वी झाले. अतिशय गरीब कुटुंबातला हा तरुण या यशामुळे अचानक चर्चेत आला. विशाल यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समजल्यावर गावात आनंदाचं वातावरण होतं. विशालचं अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली होती. विशालचं हे यश अन्य तरुणांसाठी एक उदाहरण ठरलं आहे.
विशालनं आपल्या यशाचं पूर्ण श्रेय कुटुंबाला आणि त्याचे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांना दिलं आहे. कठीण परिस्थितीत मला माझे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांनी खूप मदत केली, असं विशाल आवर्जून सांगतो. शिक्षणासाठी त्यांनी विशालची फी भरली. पैशाची अडचण असताना त्यांनी विशालला आपल्या घरात आसरा दिला. जेव्हा विशाल नोकरी करू लागला तेव्हा त्यांनी त्याला नोकरी सोडून यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. तसंच त्यासाठी त्याला प्रोत्साहनदेखील दिलं. गौरीशंकर प्रसाद यांनी विशालला आर्थिक मदतही केली. अस विशाल बोलताना सांगतो. यूपीएससी परीक्षेत आपला ठसा उमटवणारा विशाल अत्यंत गरीब कुटुंबातला आहे. त्याच्या वडिलांचं 2008 मध्ये निधन झालं आहे. त्याचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर विशालच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच खालावली. त्यामुळे विशालची आई यांनी शेळी आणि म्हैसपालन करून कुटुंबाचं संगोपन केलं. विशालचे वडील नेहमी म्हणायचे की, ‘माझा मुलगा शिक्षण घेऊन मोठा माणूस होईल.’ वडील वारले; पण विशालने त्याच्या वडिलांचं स्वप्न साकार केलं. विशाल 2011 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरला. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. आयआयटी कानपूरमधून उत्तीर्ण झाल्यानंतर विशालला रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी मिळाली. विशाल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. वडिलांच्या निधनानंतर त्याने नोकरी करण्यास सुरुवात केली आणि अथक प्रयत्नांतून त्याने हे यश मिळवलं,
असं त्याचे शिक्षक गौरीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.