खंजीर घेऊन तरुण मागे लागला; जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक केबिनमध्ये लपला.

दोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचा वाद शमल्यानंतर पुन्हा तो वाद फिल्मी स्टाईलने उफाळून आला आहे. एका तरुणाने खंजीर घेऊन हॉटेल चालकाचा पाठलाग केला, तर हॉटेल चालकाने जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पेट्रोलपंपाचे केबिन गाठले. मात्र, हल्लेखोराने एवढ्यावरच न थांबता त्या हॉटेल चालकाचा तेथेही पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजिराने सपासप वार केल्याने हॉटेल चालक जखमी झाला.
हल्लेखोराने एवढ्यावरच न थांबता त्या हॉटेल चालकाचा तेथेही पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजिराने सपासप वार केल्याने हॉटेल चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नमस्कार चौक परिसरात असलेल्या माणिक पेट्रोल पंपावर घडली.शहरातील नमस्कार चौकात असलेल्या एम एच २६ हॉटेल चालकाचा आणि तरुणाचा दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला. तो वाद तिथेच मिटल्यानंतर शनिवारी सायंकाळी तो तरुण पुन्हा हॉटेलमध्ये आला. त्या दोघांचाही वाद चिघळल्यानंतर तरुणाने खंजीर बाहेर काढला.
जिवाच्या भीतीने हॉटेल चालक रस्त्यावर इकडे तिकडे पळू लागला. शेवटी तो जीव वाचवण्यासाठी माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये घुसला. तिथे झालेल्या मारामारीत हॉटेल चालक जखमी झाला. हॉटेल मालकावर सध्या नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हॉटेल चालकावर वार करणारा तरुण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते.
हल्ला करून तो बसने फरार झाला आहे. सदर घटना समजताच विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहे.