खा. निलेश लंके यांचा बाबा पीर रतननाथ मंदिराला पाठिंबा; धार्मिक संवेदनशीलता अबाधित ठेवण्याची सरकारला सूचना.

अहिल्यानगर : प्रतिनिधी
दिल्लीतील झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिराच्या जमिनीवर महानगरपालिकेने केलेल्या बुलडोझर कारवाईनंतर स्थानिक भक्त आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. धार्मिक भावनांना धक्का बसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. अशा संवेदनशील वातावरणात खासदार नीलेश लंके यांनी मंदिराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत भाविकांना धीर दिला.
महानगरपालिकेच्या कारवाईनंतर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाई करताना ना पूर्वसूचना देण्यात आली, ना मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा अनादर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेनंतर खासदार निलेश लंके यांनी काल मंदिराला भेट देत मंदिर परिसराची पाहणी करून साधू–महंत व मंदिर व्यवस्थापनाशी समोरासमोर चर्चा केली. त्यांनी स्थानिक भक्तांच्या भूमिका व तक्रारींची माहिती समजून घेतली. भेटीदरम्यान त्यांनी झालेल्या कारवाईबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत धार्मिक स्थळांवरची कोणतीही सरकारी पावले अतिशय संवेदनशीलतेने, पारदर्शकतेने आणि कायदेशीर चौकटीत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
खासदार लंके यांनी मंदिर समितीला ठाम पाठिंबा दर्शवित पुढील पाऊल म्हणून केंद्र सरकारकडे लेखी निवेदन देणे, घटनेची चौकशी आणि न्याय मिळवण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलणे, धार्मिक भावना अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो दबाव टाकणे यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
खासदारांच्या भेटीनंतर मंदिर परिसरात दिलासा व समाधान व्यक्त केले गेले. भक्तांनी “धार्मिक परंपरा, आस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचा सन्मान राखावा” अशी ठाम मागणी पुन्हा अधोरेखित केली.



