व्याजाच्या पैशाला कंटाळून त्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल.

सोमनाथ वसंत पवार वय वर्ष 30 राहणार कोथाळे तालुका मोहोळ, या तरुणाने व्याजाने घेतलेले पैसे परत देऊनही अजूनही पैसे दे अशा सततच्या धमकीला कंटाळून आपले जीवन यात्रा संपवली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ हा राहणार कोथाळे तालुका मोहोळ येथे आपले वडील पत्नी व दोन मुलां समवेत राहत होता. त्याने सन 2019 मध्ये काही आर्थिक अडचणीमुळे तुकाराम बापू तेरवे व राजाराम गोरख सलगर दोघे राहणार पुळूजवाडी तालुका पंढरपूर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या व्याजापोटी त्याने आपली जमीन घरातील लोकांना कोणतीही कल्पना न देता त्यांना खरेदी करून दिली होती.
घरातील लोकांना सन 2020 मध्ये याबाबत जेव्हा समजले तेव्हा त्यांनी उर्वरित जमीन विकून राजाराम सलगर यास सात लाख रुपये व तुकाराम तेरवे यास नऊ लाख रुपये देऊन संपूर्ण व्यवहार मिटवून संपूर्ण जमीन सोमनाथ ची पत्नी अश्विनी हिच्या नावे केली होती. परंतु दिनांक 25 /5/ 2023 रोजी सायंकाळी नऊ वाजता राजाराम गोरख सलगर, लिंगदेव कृष्णा सलगर, व काकासाहेब दशरथ सलगर यांनी घरी येऊन आमचे आणखीन पैसे तुझ्याकडे फिरतात ते आत्ताच्या आत्ता दे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे सोमनाथ अत्यंत तणावात होता. दिनांक 27/ 5/ 2023 रोजी पहाटे सोमनाथ ने मी औषध पिलो आहे मला कसंतरी होतंय मला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणून त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सांगितले. तेव्हा त्याला तातडीने CNS हॉस्पिटल सोलापूरला हलवण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत कामती पोलीस स्टेशनला सोमनाथच्या वडिलांनी फिर्यादी असून माझ्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सदर राजाराम गोरख सलगर, तुकाराम बापू तेरवे, लिंगदेव कृष्णा सलगर, काकासाहेब दशरथ सलगर, यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सोमनाथच्या कुटुंबीयांनी केली आहे.