एक टाळी शर्विलच्या वाढदिवसासाठी…! म्हणून त्यांनी मुलाचा वाढदिवस केला तृतीय पंथीयासोबत साजरा.
प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलाचा वाढदिवस जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा व्हावा. कारण मुलांचा वाढदिवस आई-वडिलांसाठी फार खास असतो. आपल्या मुलांचा वाढदिवस अगदी आनंदात साजरा व्हावा म्हणून प्रत्येक आई-वडील प्रयत्नशील आणि उत्साही असतात. आपल्या मुलाचा वाढदिवस आगदी अविस्मरणीय व्हावा, मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांनी सुद्धा या सोहळ्याच्या आठवणी पाहून खुश व्हावे अशी त्यांची इच्छा असते. त्याला आम्ही देखील अपवाद नाहीत. मात्र कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे ८ सप्टेंबरला शर्विलचा पहिला वाढदिवस आम्ही घरीच अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला.
बघता बघता शर्विलचा दुसरा वाढदिवस जवळ आला. हा दुसरा वाढदिवस एखाद्या सामाजिक संस्थेत करायचं हे आम्ही ठरवलं. परंतू ते कुठे? कोणा सोबत करायचं ? हे ठरवत असताना कोरोनामुळे लोकांचे झालेले हाल पाहून आम्ही हा वाढदिवस तृतीयपंथीयांसोबत साजरा करण्याचं ठरवलं. आणि कल्याणमधील तृतीयपंथी गरिमा गृह या तृतीयपंथीयांच्या संस्थेत जाऊन, आम्हाला मुलाचा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करायचा आहे असं सांगितलं, त्यावेळी भारावलेल्या त्यांनी आम्हालाही शर्विलचा वाढदिवस आमच्या संस्थेत साजरा करायला आवडेल असं लगेच सांगितलं.
शर्विल पिटेकर याच्या वाढदिवसासाठी गरिमा गृहमध्ये डेकोरेशनकरता मी फुगे, पोस्टर आणि इतर किरकोळ साहित्य घेऊन गेलो. तेव्हा तिथे झोया नावाच्या बहिणीनं आम्ही सर्व करतो म्हणत पुढाकार घेत, डेकोरेशनची जबाबदारी स्वतःकडे घेतली. आणि अतिशय आकर्षक अशी सजावटही केली.
ठरल्याप्रमाणे ८ सप्टेंबरला शर्विलची हॉलमध्ये एंट्री होताच सर्व तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवून आणि स्वागत गीत गाऊन आमचं जल्लोषात स्वागत केलं. सर्व जण एक एक करून शर्विलला उचलून घेत होते. त्याची आपुलकीनं विचारपूस करत त्याला प्रेमाने शुभेच्छा देत होते. त्यांच्यातील काही जण हा सर्व सोहळा कॅमे-यात चित्रीत करत होते.
केक कापण्याआधी पाच भगिनी आणि माझी धर्मपत्नी दीपाली यांनी शर्विलचं औक्षण केलं. आपण टिळा लावताना कुंकवाला बोट लावून ते बोट कपाळाला लावतो आणि लगेच बोट बाजूला करतो. मात्र तृतीयपंथीयांची टिळा लावायची पद्धत वेगळी आहे. त्या खूप छान पद्धतीनं कुंकुवाचं बोट शर्विलच्या कपाळावर साधारण 30 ते 40 सेकंद ठेऊन त्या दरम्यान आशीर्वाद देत शर्विलचं औक्षण करत होत्या. त्यानंतर केक कापण्याच्या वेळी त्या सर्वांनी एका सुरात, सुंदर आवाजात ‘हॅपी बर्थडे टू यू शर्विल…हॅपी बर्थडे शर्विल…हे गाणं गायलं. सोबतच बार बार दिन ये आए, बार बार ये दिल ये गाए… तुम जियो हजारो साल.. हे गाणंही गायलं. पूर्ण हॉलमध्ये त्यांचा आवाज घुमत होता. केक कापल्यानंतर एका बहिणीने शर्विलला केक भरवला.आणि पुन्हा एक एक करून सर्वांनी शर्विलसोबत फोटो काढले.
केक कापल्यानंतर सर्वांचा एक फोटो घेतल्यानंतर आम्ही पिटेकर परिवारातर्फे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. ती स्वीकारल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाही दिली. तेव्हा अक्षरश: अंगावर शहारे आले. समाजात उपेक्षाच वाट्याला आलेल्या त्यांच्यातली छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा यावेळी ठळकपणे दिसून आली.
एकंदरीत शर्विलचा वाढदिवस गरिमा गृह संस्थेत साजरा करताना वेगळाच अनुभव आला. कारण आपण तृतीयपंथीयांच्या संस्थेत आहोत, हा विचारच मनात नव्हता. आपलं कुटुंब, आई-वडील, मित्र जसा आपला वाढदिवस साजरा करतात. त्याच आपुलकीने, प्रेमाने, या सर्वांनीही शर्विलसोबत आमच्यावरही प्रेमाचा वर्षाव केला.